१८ वर्षे सहा महिन्यांनंतर शरद पवार पुण्याच्या काँग्रेस भवनात

  • Written By: Published:
१८ वर्षे सहा महिन्यांनंतर शरद पवार पुण्याच्या काँग्रेस भवनात

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे तब्बल १८ वर्षे ६ महिन्यांनंतर पुण्यातील काँग्रेसभवनमध्ये पाऊल ठेवणार आहेत. शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर शरद पवार हे पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये दोनदाच गेले आहेत. एकदा ते बाहेर पडल्यानंतर पाच वर्षांनी काँग्रेस भवनामध्ये गेले होते. तर आज अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त जात आहेत.

शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनाला उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्या, अशी विनंती कॉंग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांनी केली होती. त्याचाच मान ठेवत शरद पवार आज 7 वाजता काँग्रेस भवनामध्ये भेट देत काँग्रेस कार्यकर्त्यांना शुभेच्छा देणार आहेत. महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात गेल्या साडेपाच दशकांपासून शरद पवार या नावाचा दबदबा आहे. राजकारणात मुरब्बी राजकारणी म्हणून शरद पवारांची पूर्वीपासून ओळख आहे. 1999 साली काँग्रेसमध्ये सोनिया गांधी या नावाचा दबदबा सुरु झाला होता. यावेळी शरद पवारांनी सोनिया गांधी यांचा विदेशी असण्याचा मुद्दा उचलून धरत त्यांना विरोध करण्यास सुरवात केली.

सोनिया गांधींच्या विदेशी असण्यावर आक्षेप घेणारं पत्रही पवारांनी काँग्रेस नेतृत्वाला लिहिले होते. शरद पवारांच्या या पत्रानंतर काँग्रेस कार्यकारणीची एक महत्वाची बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर शरद पवार यांच्यासह बिहारमधील तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांना सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं होतं.

काँग्रेस पक्षानं निलंबनाची कारवाई केल्यानंतर शरद पवार यांनी अन्वर आणि संगमा यांच्या साथीने 10 जून 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर शरद पवार हे २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी काँग्रेस भवनमध्ये आले होते. तेव्हा त्यांच्यावर कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ते थेट जाहीर सभा घेऊ शकत नव्हते. त्याऐवजी मोठ्या शहरांत त्यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रितपणे भूमिका मांडण्याचे नियोजन केले होते.

तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने भारतातील नद्या जोडण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. या योजनेत महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचे पवार यांचे म्हणणे होते. त्याविरोधात पवार यांनी जलसंपदा विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांसोबत पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी वाजपेयी सरकारवर हल्लाबोल केला. ही पत्रकार परिषद संपताना पत्रकारांनी पवार यांना काँग्रेस भवनामध्ये आल्यानंतर कसं वाटतयं, असा प्रश्न केलाच. त्यावर त्यांनी आम्हाला आमचे घर बरे आहे, असे सांगितले होते. त्यावर बराच हशा उसळला. आता त्यानंतर पवार काँग्रेस भवनमध्ये पाय ठेवत आहे.

पुणे शहरामध्ये काँग्रेसच्या अनेक पिढ्या होऊन गेल्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला; तसेच अनेक चळवळी झाल्या. त्याचे उगमस्थान हे काँग्रेस भवन होते. सुरवातीच्या काळात शरद पवार हे देखील त्याचाच एक भाग होते. त्यामुळे आजचा दिवस पुण्यातील राजकीय इतिहासात महत्वाचा मानला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube