शेखर बागडे : अजित पवारांनी प्रॉपर्टीचे आरोप केले.. आव्हाडांनी थेट ऑडिओ क्लिपच समोर आणली!

शेखर बागडे : अजित पवारांनी प्रॉपर्टीचे आरोप केले.. आव्हाडांनी थेट ऑडिओ क्लिपच समोर आणली!

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे. मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेले पोलीस अधिकारी. शिवसेना-भाजपच्या मधूर संबंधांमध्ये याच पोलीस अधिकाऱ्यामुळे मिठाचा खडा पडला असल्याचं बोललं जात आहे. या पोलीस अधिकाऱ्याची बदली व्हावी म्हणून भाजप आग्रही आहे. तर श्रीकांत शिंदे यांनी काही क्षुल्लक कारणावरुन युतीमध्ये मिठाचा खडा टाकत असतील तर मी राजीनामा देतो, अशी भूमिका घेतली. या दोन्ही वेगवेगळ्या भूमिकांमुळे भाजप आणि शिवसेना युतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. (Ncp MLA Jitendra Awhad shared controversial police officer Shekhar Bagade’s audio clip)

दरम्यान, विरोधी पक्षाकडून शेखर बागडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि बेहिशोबी संपत्तीचे आरोप करण्यात आले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेखर बागडे (PI Shekhar Bagde) यांच्याकडील बेहिशेबी मालमत्तेची लिस्टच वाचून दाखवली. एका साध्या पोलीस ऑफिसरकडे एवढी मालमत्ता कशी काय असू शकते? असा सवाल करत त्यांच्या चौकशीची मागणी केली. त्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या पोलीस अधिकाऱ्याची एक ऑडियो क्लिप शेअर करत या प्रकरणात पुरावेच समोर आणले आहेत. याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

शिवसेना, भाजपामध्ये ज्या गोष्टीवरुन ठाण्यामध्ये वाद सुरु आहे; तो मानपाडा येथील पोलीस निरीक्षक शेखर बागडे याच्यामुळे प्रचंड पैशाचा उन्माद, “मी त्यांना फाट्यावर मारतो” हे त्याचे आवडते विधान. पैशाच्या मग्रुरीमुळे आपण कोणालाही विकत घेऊ शकतो हे त्याच्या डोक्यामध्ये फिट बसले आहे. आज अजित पवार यांनी त्याची प्रॉपर्टी वाचून दाखवली ही प्रॉपर्टी त्याच्या असलेल्या प्रॉपर्टीच्या 20 टक्के पण, नाही. अजून तर त्याची खूप प्रॉपर्टी इकडे-तिकडे पसरलेली आहे. खालापूर येथे एक फूड कोर्ट पेट्रोल पंप जे MSRDC ने ज्याच्या नावावर दिले होते त्याच्याकडून जबरदस्तीने पार्टनरशीप घेऊन त्याला चेक देऊन आणि नंतर त्या चेकचा व्यवहार पूर्ण न करता ते फुड कोर्ट पेट्रोल पंप आणि त्याच्या आजूबाजूची सगळी जागा शेखर बागडे ने बळकावली आहे.

प्रचंड दादागिरी करुन मूळ मालकास तेथे येण्यासही मज्जाव केला आहे. तो मूळ मालक तेथे गेल्यास स्थानिक पोलीसच त्या मूळ मालकाला अटक करतात. कारण बागडे साहेबांचा एरीया आहे. तिथे बाऊन्सर बसवले आहेत. तिथे गुंडांची ये-जा सुरु असते. आणि दिवसाला जवळ-जवळ 20 ते 25 लाख रुपयांची कमाई तिथे होते. पेट्रोल पंपाचा चेक आणि सीसीडे चा चेक हा अधिकृत असल्याने मूळ मालकाच्या खात्यावर जातो. उर्वरीत संपूर्ण रोख पैसे बागडे आपल्या घरी घेऊन जातो. ह्या सगळ्या प्रॉपर्टीवर लोन आहे. त्या लोनचा EMI मात्र त्या गरीबाला भरावा लागतो. पोलीसांकडे अनेक तक्रार येतात. पोलीस त्याची दखल देखिल घेतात, शेवटपर्यंत जातात देखिल; परंतु त्यांना वरुन फोन येतो. आता वरुन फोन कोणाचा येतो हे श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वेगळ सांगायला नको. अशा या शेखर बागडे बद्दल अजित पवार यांनी त्याच्या अनधिकृत संपत्ती बद्दल विषय काढला. त्यामुळे मी ही अधिकची माहिती महाराष्ट्राला देत आहे.

अजित पवारांनी काय आरोप केले?

पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत त्यांच्या प्रॉपर्टीची लिस्ट वाचून दाखवली. ते म्हणाले, नाशिकमध्ये जमिन, फ्लॅट्स आणि व्यावसायिक गाळे, नवी मुंबईत मोक्याच्या जागी त्यांच्या सदनिका आहेत. एवढी सगळी मालमत्ता कशी जमवली? असा सवाल करत अजित पवार यांनी शेखर बागडे यांच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्याकडे 6 कोटींची रोख रक्कम सापडली. सरकारचा प्रशासनावर कोणताही धाक नसल्याने अधिकाऱ्यांची सर्रास भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

अजित पवारांनी वाचली लिस्ट
शेखर बागडे यांची देवळाली कॅम्प येथे तीन मजली व्यावसायिक मालमत्ता आहे, निवासी फ्लॅट सुमंगल रेसिडन्सी, तिरुमल्ला हाईटस येथे दुकान आणि व्यावसायिक गाळे आहेत. तसेच रिध्दी सिध्दी कन्स्ट्रक्शन मध्येही त्यांची गुंतवणूक आहे. महावीर अमृत सोसायटी सानपाडा येथेही त्यांचा फ्लॅट आहे. पांडुर्ली तसेच इगतपुरी येथे शेतजमीन आहे, असा आरोप करत अजित पवार यांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube