आरक्षणाचा जप करत बसू नकाः पृथ्वीराज चव्हाण

  • Written By: Published:
आरक्षणाचा जप करत बसू नकाः पृथ्वीराज चव्हाण

पुणेः मराठा आरक्षणाची मागणी रास्त आहे. पण त्या करिता तुम्ही सगळ्याने आरक्षण, आरक्षण जप करण्यात अर्थ नाही. शिक्षण घ्या, ज्या दिवशी आरक्षण मिळेल, त्यावेळी आवश्यक फायदा घ्याच, पण वेळ लागणार असेल, तर पुढे काय, असा प्रश्न पडतो. त्यामुळे आपण आता अर्थकारणाकडे वळले पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.ते म्हणाले, व्यापारी म्हणून यशस्वी होणे आवश्यक असेल तर आपली मानसिकता बदलणे खूप गरजेचे आहे. आरक्षण हा मराठा समाजासाठी महत्वाचा विषय होता. अनेक वर्षांपासून तो प्रलंबित होता. शिक्षणात, प्रशासकीय सेवेत आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी होती. याला कुठे तोंड फूटत नव्हते. पण सुदैवाने माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मला आरक्षणाच्या संदर्भात कायदा करता आला. मी कायदा केल्याने आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आता काही लोक म्हणतात तो कायदा परिपक्व नव्हता, ती वस्तुस्थिती आहे.

त्यावेळेच्या कायद्याप्रमाणे 50 टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढवायचे असेल तर काही अटी होत्या. त्यातील प्रमुख अट म्हणजे राज्यातील मागासवर्गीय आयोगाने कॉन्टिफाइड डेटा गोळा करून एखाद्या समाजाचे मागासलेपण सिद्ध करायचे असते. दुर्दैवाने आयोगाने साफ सांगितले आम्ही अजिबात हे करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही. मराठा समाजाचे लोक मुख्यमंत्री आहेत. सहकार चळवळीत अग्रगण्य आहेत. त्यांना आरक्षण देण्याची गरज नाही.आम्ही त्यांना विनंती केली. तुम्ही माहिती सादर करा, माहिती योग्य आहे की नाही, त्यावरनंतर निर्णय घेऊ पण त्या आयोगाने साफ नकार दिला, असे ही चव्हाण यांनी सांगितले.

चव्हाण म्हणाले, सुरुवातीला माझ्याही मनात शंका होती की खरंच आपण आरक्षण मागायचं का? नंतर मी जेव्हा खोलवर अभ्यास केला तेव्हा मला जाणवले अल्पभूधारक शेतकरी असतील शेतमजूर असतील, यांच्या घरातील मुलांची परिस्थिती कठीण आहे. तेव्हा आपण ही मागणी करायला हवी. ही माहिती गोळा करण्याकरता आयोगाने नकार दिल्यानंतर आम्ही राणे समिती गठीत केली. राणी समितीने दिलेल्या माहितीच्या आधारे 2013 – 14 मध्ये अध्यादेश पारित करून आरक्षणाचा कायदा केला. त्यावेळी निवडणुकीमध्ये प्रचार करताना मी सांगत होतो, जर 2014 च्या निवडणुकीत वेगळ्या विचाराचा सरकार आले तर हे आरक्षण विसरा,पुढे तेच झाले. सहा महिने आरक्षण मिळाले. मात्र पुढे त्याचा कोणी कोर्टात बचाव केला नाही. आरक्षण ही गरज होती ती गरज पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला

आरक्षण मिळेल म्हणून मागणी रास्त आहे. पण त्याकरता तुम्ही सगळ्यांनी आरक्षण आरक्षण जप करण्यात अर्थ नाही. शिक्षण ज्या दिवशी मिळेल त्यादिवशी आवश्यक फायदा घ्या पण त्याला वेळ लागणार असेल तर पुढे काय? आपण आता अर्थकारणाकडे वळलं पाहिजे, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड, इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube