ठाण्यात पुन्हा ठाकरे आणि शिंदे गट भिडले; जाणून घ्या वादाचे कारण
ठाणे : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यामुळे आता राजकीय नेत्यांपाठोपाठ आता कार्यकर्त्यांमध्ये देखील वाद होऊ लागले आहे. नुकतेच ठाण्यातील शिवाई नगर या परिसरात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले. या वादानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटातली वाद आणखीच पेटला. नुकतेच ठाण्यातील शिवाई नगरची शाखा ताब्यात घेण्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
या ठिकाणी कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. या आधीही ठाण्यातील लोकमान्य नगर येथील शिवसेनेची 45 वर्ष हून अधिक जुनी असलेली शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर आले होते.
ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. यातच आता अधिकृत शिवसेना पक्षचिन्ह व नाव मिळाल्याने शिंदेंची राजकीय ताकद देखील वाढली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शाखा, तसेच कार्यालये ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होत आहे. यातूनच हे वाद निर्माण होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे आता एकनाथ शिंदे गटाला मिळाल्याने ठाकरे गटाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले. ही शाखा प्रताप सरनाईक यांनी बांधली असून या ठिकाणचे नगरसेवक आपल्यासोबत असल्याने ही शाखा आमचीच असल्याचं ते म्हणाले.