छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक का म्हणतात? छगन भुजबळांचा सवाल
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांना गोब्राह्मण प्रतिपालक असे का म्हणतात? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ते आज पुण्यातून बोलत होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात घमासान सुरु झालंय. विरोधकांकडून राज्यभरात आंदोलन करीत अजित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे.
तर मग शिवाजी महाराज यांच्यासोबत असलेले तानाजी मालुसरे कुणबी होते, शिवा काशीद नाव्ही होते, दलित समाजाचेही अनेक लोकं होती. शिवाजी महाराज त्यांचे नाहीत का? महाराज फक्त काय ब्रम्हणांचे पालक झाले का? इतरांचे पालक नाहीत का? त्यावेळेच्या ब्रम्हणांनी राज्यभिषेकाला विरोध केला त्यांचे कसे काय पालक होऊ शकतात? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवार यांच्यावर आरोप होतोय तर मग छत्रपती शिवाजी महाराजांना गो ब्राम्हण प्रतिपालक का म्हटले जायचे. शिवाजी महाराज ब्रामह्णांचे पालक असू शकतात, गाईचे कसे? ही विशेषणे कोणी दिली? असे प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केले आहे.
दरम्यान, मी सर्व ब्राम्हण जातीबद्दल बोलत नाही. महात्मा फुलेंना त्याच्या कार्यात सहकार्य करणारे देखील अनेक ब्राम्हण होते असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. अजित पवारांनतर जितेंद्र आव्हाड आणि आता छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.