Reasi Bus Attack : ड्रायव्हरच्या धाडसाने वाचले अनेकांचा प्राण; रियासी हल्ल्यापूर्वीचे CCTV फुटेज समोर

Reasi Bus Attack : ड्रायव्हरच्या धाडसाने वाचले अनेकांचा प्राण; रियासी हल्ल्यापूर्वीचे CCTV फुटेज समोर

जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात काल (रविवारी) संध्याकाळी यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. हल्ल्यानंतर ड्रायव्हरचा तोल सुटल्याने बस खोल दरीत जाऊन कोसळली. या प्राणघातकी हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 33 जण जखमी झाले आहेत. हल्ल्यात मृत्यूमृखी पडलेल्या यात्रेकरुंना उपराज्यपाल कार्यालयाने 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, या हल्ल्यापूर्वी काही क्षण आगोदरचेच एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. या फुटेजमध्ये हल्ल्यापूर्वी बस एका वळणावरुन जाताना दिसत आहे. याच वळणावरुन पुढे जाताना बसचा वेग कमी असल्याचा फायदा घेत दहशतवाद्यांनी लक्ष केले. मात्र ड्रायव्हरने धाडसाने बस न थांबवता वेगात पळवल्याने अनेकांचे प्राण वाचले असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्याचा सर्व तपास सध्या जम्मू-काश्मीर पोलीस आणि एनआयएकडून सुरु आहे. (A CCTV footage showing the moments leading up to the Reasi terror strike in Jammu and Kashmir)

सध्या समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटजेमध्ये भाविकांना वैष्णोदेवीकडे घेऊन जाणारी संबंधित पांढरी बस दिसून येत आहे. रविवारी संध्याकाळी 6 वाजताच्या या व्हिडिओत बस कटराकडे जाताना दिसत आहे. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांनंतर दहशतवाद्यांनी बसवर बेछूट गोळीबार केला. यावेळी बसच्या चालकाने मोठे धाडस दाखवत बस तेथून भरधाव वेगाने पळवून नेली. यादरम्यान त्यालाही गोळी लागली. या घटनाक्रमात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत पडली. पण त्याच्या धाडसामुळेच या हल्ल्यात अनेकांचे प्राण वाचले आहेत. अन्यथा, तेथे नरसंहार घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता असे म्हणावे लागेल.

पीडितांसाठी हेल्पलाइन सुरू :

या हल्ल्याबाबत बोलताना रियासीचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक मोहिता शर्मा म्हणाल्या. ‘प्राथमिक अहवालानुसार, शिवखोडी येथून कटरा जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत पडली. सध्या बचावकार्य पूर्ण झाले असून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत. या जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांमध्ये बस चालकाचाही समावेश आहे. या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेले यात्रेकरू दिल्ली आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. प्रशासनाकडून पीडितांसाठी 01991-245639, 01991-245076, 0191-2542000 हे हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

तपास एनआयएकडे :

केंद्राकडून या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. लष्कराचा गणवेश घातलेल्या दहशतवाद्यांनी रियासी येथे भाविकांनी भरलेल्या बसवर हल्ला करुन जवळच्या जंगलात पळ काढला. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करून शोधमोहीम राबवली जात आहे. फॉरेन्सिक टीमही जंगलात तपास करत आहे. या निर्जन जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरक्षा यंत्रणेला कठीण झाले आहे. त्यामुळे येथे छोट्या-मोठ्या ड्रोनची विशेष मदत घेतली जात आहे. सध्या फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी जात आहे.

पीएम मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून :

यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले, पंतप्रधानांनी त्यांना परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे आणि पीडित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संयुक्त कारवाई सुरू केली असून या हल्ल्यामागे असलेल्यांना सोडले जाणार नाही, असा इशाराही सिन्हा यांनी दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज