वीर चक्र विजेते अभिनंदन यांनी एअर फोर्स सोडली ; आता उडविणार प्रायव्हेट जेट, नियम काय सांगतो ?
Abhinandan Varthaman : आता देशाचे वीरचक्र विजेते अभिनंदन वर्धमान यांनी भारतीय वायुसेनेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलीय. त्यांनी प्रादेशिक विमान कंपनी Fly91 मध्ये प्रवेश केलीय.
Abhinandan Varthaman : अभिनंदन वर्धमान. (Abhinandan Varthaman) नाव घेताच तुमच्यासमोर एक शूर इतिहास उभा राहिला असेल. हो तेच ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान. जे 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय वायूसेनेने (Indian Airforce) पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्या प्रांतातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर हल्ला करण्याचा मोहिमेत सहभागी झाले होते. त्यानंतर 27 फेब्रुवारी अभिनंदन वर्धमान यांनी मिग 210 (MiG-21 Bison) या लढाऊ विमानाने पाकिस्तानच्या अमेरिकी बनावटीच्या F-16 फायटर पाडले होते. त्यामुळे पाकिस्तानसह अमेरिकेचे नाचक्की झाली होती. या कारवाई दरम्यान अभिनंदन यांच्या विमानाचे नुकसान झाल्याने ते पाकिस्तानच्या भूमीत उतरले होते. त्याला पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. मात्र 1 मार्च 2019 रोजी त्यांची पाकिस्तानच्या ताब्यातून सुरक्षित सुटका झाली आणि ते भारतात परतले. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना ‘वीर चक्र’ या युद्धकाळातील शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आता देशाचे वीरचक्र विजेते अभिनंदन वर्धमान यांनी भारतीय वायुसेनेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलीय. त्यांनी प्रादेशिक विमान कंपनी Fly91 मध्ये प्रवेश केलीय. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, वायुसेनेत फायटर जेट उडवणारा पायलट खासगी प्रवासी विमान कसे उडवू शकतो? त्यासाठी कोणते नियम आहेत? हे जाणून घेऊया..
अभिनंदन यांनी संरक्षण मंत्रालयाकडून घेतला NOC
अभिनंदन यांनी याच वर्षी 31 मार्च रोजी भारतीय वायुसेना सोडली आणि त्यानंतर खासगी प्रादेशिक विमान कंपनी Fly91 शी जोडले गेले. आहेत. अभिनंदन यांनी भारतीय वायुसेनेतील सेवा पूर्ण केल्यानंतर संरक्षण मंत्रालयाकडून NOC घेतलीय. त्यानंतरच त्यांनी नागरी विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश केलाय.
खासगी विमान कंपन्यांमध्ये माजी लष्करी पायलटांना मोठी मागणी
भारतीय वायुसेनेसह तिन्ही सैन्यदलांतील पात्र पायलट सेवा पूर्ण केल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर नागरी विमान कंपन्यांमध्ये पायलट म्हणून काम करू शकतात. मात्र, त्यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि प्रक्रिया पूर्ण करावी लागते. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात माजी लष्करी पायलटांना मोठी मागणी असते. वायुसेनेच्या पायलटांकडे कठीण परिस्थितीत विमान उडवण्याचा हजारो तासांचा अनुभव, शिस्त आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण असते. त्यामुळे व्यावसायिक विमान कंपन्यांकडून त्यांना प्राधान्य दिले जाते.
वायुसेना पायलटला थेट कमर्शियल विमान उडवता येत नाही
लष्करी पायलट अत्यंत प्रशिक्षित आणि अनुभवी असले तरी वायुसेनेची नोकरी सोडल्यानंतर ते थेट प्रवासी विमान उडवू शकत नाहीत. त्यासाठी भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) निश्चित केलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
NOC घेणे आवश्यक
सैन्यदलातील अधिकारी सेवेत असताना कोणत्याही खासगी किंवा व्यावसायिक संस्थेत काम करू शकत नाही. लष्करी पायलट साधारणपणे दोन मार्गांनी वायुसेनेतून बाहेर पडू शकतात. शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC): निश्चित 10 ते 14 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर.
परमनंट कमिशन (PC): वेळेपूर्वी निवृत्ती (PMR) किंवा साधारणपणे 20 वर्षांची पेन्शनपात्र सेवा पूर्ण केल्यानंतर. यासोबतच वायुसेना मुख्यालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृत NOC घेणे आवश्यक असते.
DGCA लायसन्समध्ये रूपांतर
लष्करी पायलटकडे असलेला विमान उड्डाण परवाना नागरी विमान कंपन्यांसाठी थेट लागू होत नाही. त्यामुळे DGCAच्या नियमांनुसार त्याचे आवश्यक रूपांतर करावे लागते. फायटर जेट किंवा लष्करी मालवाहू विमान उडवण्याचा अनुभव असला तरी प्रवासी विमान उडवण्यासाठी नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील आवश्यक पात्रता पूर्ण करावी लागते.
फ्लाइंग लॉगबुकची पडताळणी
वायुसेनेत पायलटने केलेल्या उड्डाणाच्या तासांची म्हणजेच Flying Hours ची DGCAकडून पडताळणी केली जाते. त्यासाठी पायलटच्या लॉगबुकचे व्हेरिफिकेशन आवश्यक असते.
DGCAच्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात
माजी लष्करी पायलटांना नागरी विमान वाहतुकीशी संबंधित विविध तांत्रिक परीक्षा द्याव्या लागतात. यामध्ये एअर रेग्युलेशन्स, नागरी विमान वाहतूक नियम आणि एव्हिएशन मेटिऑरॉलॉजी यांसारख्या विषयांचा समावेश असतो.
क्लास-1 मेडिकल टेस्ट
लष्करी सेवेदरम्यानच्या वैद्यकीय निकषांव्यतिरिक्त DGCAने मान्यता दिलेल्या वैद्यकीय केंद्रातून Class-1 Medical प्रमाणपत्र मिळवावे लागते.
टाइप रेटिंग आणि सिम्युलेटर ट्रेनिंग
फायटर जेट आणि कमर्शियल प्रवासी विमान उडवण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे ज्या विमानाचा प्रकार उडवायचा आहे, त्यानुसार विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते.
फायटर आणि हेलिकॉप्टर पायलट
अभिनंदन यांच्यासारख्या फायटर जेट पायलटांना Airbus A320, Boeing 737 किंवा ATR यांसारखी प्रवासी विमाने उडवण्यासाठी संबंधित विमानाची Type Rating आणि Simulator Training पूर्ण करावी लागते.
ट्रान्सपोर्ट, कार्गो पायलट
भारतीय वायुसेनेत C-17 Globemaster, C-130J Super Hercules किंवा AN-32 यांसारखी मोठी मालवाहू विमाने उडवणाऱ्या पायलटांना मल्टी-इंजिन कमर्शियल विमानांच्या ऑपरेशनशी जुळवून घेणे तुलनेने सोपे ठरू शकते.अशा प्रकारे, भारतीय वायुसेनेतील लढाऊ विमान उडवण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले अभिनंदन आता नागरी विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश करत आहेत.