र्षभरापूर्वी निधन, तरी भाजपच्या प्रांतीय टीममध्ये मिळालं पद; यादी पाहून सगळेच चक्रावले
BJP Labour Cell : वर्षभरापूर्वी निधन झालेल्या भाजप नेत्याचं नाव पक्षाच्या नव्या प्रांतीय कार्यकारिणीत आल्याने प्रश्नचिन्ह.
BJP Labour Cell : भाजपच्या श्रम प्रकोष्ठाची प्रांतीय (BJP) कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आंबेडकर नगरमध्ये एका अनोख्या चुकीची चर्चा सुरू झाली आहे. सुमारे वर्षभरापूर्वी निधन झालेल्या भाजप नेत्याचा समावेश या नव्या टीममध्ये करण्यात आला आहे. शनिवारी उशिरा जाहीर झालेल्या 11 सदस्यीय कार्यकारिणीत टांडा येथील दिवंगत नेते राम सूरत मौर्य यांना सदस्यपद देण्यात आलं आहे. त्यामुळे कार्यकारिणीची यादी समोर येताच सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा रंगली.
राम सूरत मौर्य यांचं जवळपास एक वर्षापूर्वी निधन झालं होतं. असं असतानाही त्यांचं नाव प्रांतीय टीममध्ये समाविष्ट झाल्याने संघटनेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पक्षासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याची हयातीत योग्य दखल घेतली गेली नाही, मात्र निधनानंतर त्यांना पद देण्यात आलं, अशी टीका या निमित्ताने होत आहे. ही केवळ यादी तयार करताना झालेली चूक नसून कार्यकर्त्यांप्रती संघटनेची संवेदनशीलता आणि जबाबदारी यावरही प्रश्न निर्माण करणारी बाब असल्याची चर्चा आहे.
ज्ञानेश कुमारांनंतर मोदी-शाहांचा नंबर’; राहुल गांधींचा इशारा, म्हणाले, पळू देणार नाही!
प्रांतीय कार्यकारिणी जाहीर करण्यापूर्वी संबंधित जिल्हा संघटनेकडून माहिती किंवा अभिप्राय घेण्यात आला होता का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हा पातळीवरून सूचना मागवण्यात आल्या असतील, तर त्यांचा विचार का झाला नाही, याबाबतही चर्चा सुरू आहे. एखाद्या नेत्याचा समावेश करण्यापूर्वी त्याच्याबाबतची प्राथमिक माहिती तपासली गेली होती का, याबद्दल आता संघटनेला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. या प्रकारामुळे कार्यकारिणीच्या यादीची पडताळणी नेमकी कशी करण्यात आली, यावरही लक्ष वेधलं जात आहे.
या प्रकरणावर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देव पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रांतीय कार्यकारिणीच्या यादीत कुठेतरी चूक झाल्याचं त्यांनी मान्य केलं. या संदर्भातील माहिती प्रदेश कमिटीकडे पाठवण्यात आली असून, लवकरच दुरुस्त केलेली यादी जाहीर केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे दिवंगत नेत्याचा समावेश असलेली ही यादी बदलून नव्याने कार्यकारिणी प्रसिद्ध केली जाणार आहे.