तुमच्या तिजोरीतील ‘हॉलमार्क’ सोनं खरंच शुद्ध आहे? CAG च्या अहवालाने उडवली झोप
CAG Rreport On Bis Hallmark Gold तुम्ही हॉलमार्क पाहून सोन्याचे दागिने खरेदी करता? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण...
CAG Rreport On Bis Hallmark Gold Purity Standards : सोनं खरेदी करताना आपण सर्वात आधी ‘हॉलमार्क’ (Hallmark) आहे की नाही हे तपासतो. सरकारची ही मोहर म्हणजे सोन्याच्या शुद्धतेची 100 टक्के खात्री, असाच सर्वसामान्यांचा विश्वास असतो. मात्र, देशातील सर्वात मोठी सरकारी ऑडिट संस्था असलेल्या ‘कॅग’ च्या एका ड्राफ्ट रिपोर्टने या विश्वासाला मोठा तडा दिला आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या हॉलमार्क सोन्याच्या शुद्धतेवर नीट देखरेख ठेवत नसल्याचे धक्कादायक वास्तव या अहवालातून समोर आले आहे.
हॉलमार्किंग प्रणाली कशी कार्य करते?
हॉलमार्क म्हणजे केवळ एक शिक्का नाही तर, ती एक संपूर्ण साखळी आहे. ज्वेलर्स BIS कडे नोंदणी करतात आणि त्यानंतर त्यांचे दागिने BIS-मान्यताप्राप्त असेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर (AHC) मध्ये पाठवतात. तिथे सोन्याच्या शुद्धतेची तपासणी केली जाते आणि प्रत्येक दागिन्याला सहा-अक्षरी अल्फान्यूमेरिक हॉलमार्क युनिक आयडी दिला जातो. हा HUID त्या दागिन्याची ओळख असतो, जो तुम्ही BIS ॲपद्वारे स्कॅन करून पडताळून पाहू शकता.
सरकारी आकडेवारीनुसार, 31 जुलै 2026 पर्यंत 65 कोटींहून अधिक सोन्याच्या दागिन्यांना HUID मिळाले आहेत. तर, BIS मध्ये नोंदणीकृत सराफांची संख्या 43,153 वरून 2,29,590 पर्यंत वाढली आहे आणि एएचसीची संख्या 948 वरून 1,577 पर्यंत वाढली आहे. याचा अर्थ प्रणालीची रचना विस्तारली आहे.
कॅगच्या मसुदा अहवालातील धक्कादायक आकडेवारी कोणती?
नियमानुसार, BIS ने दरवर्षी किमान एकदा तरी नोंदणीकृत ज्वेलर्सच्या दुकानांना भेट देऊन सोन्याच्या शुद्धतेची तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र, 2020-21 पासून गेल्या पाच वर्षांत BIS तब्बल 83.25 टक्के नोंदणीकृत ज्वेलर्सच्या दुकानांपर्यंत पोहोचलेच नसल्याचे CAG च्या ऑडिटमध्ये उघड झाले आहे.
केवळ 2024-25 या आर्थिक वर्षाचा विचार केल्यास, देशातील 28,865 परवानाधारक ज्वेलर्सपैकी केवळ 5,444 दुकानांचीच तपासणी झाली. याचाच अर्थ 81.13 टक्के दुकानदारांची कोणतीही तपासणी झालेली नाही. फक्त ज्वेलर्सच नाही, तर ज्या केंद्रांवर (AHC) सोन्याची शुद्धता तपासली जाते, त्यांच्या देखरेखीतही BIS आपल्या उद्दिष्टापेक्षा 43.7 टक्के मागे राहिले आहे.
जेव्हा कॅगला हा निष्काळजीपणा आढळून आला, तेव्हा बीआयएसने कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे आणि दुर्गम भागातून नमुने गोळा करणे कठीण असल्याचे सांगून स्वतःचा बचाव केला. पण, कॅगने हे कारण फेटाळून लावले. हॉलमार्किंगचा उद्देश ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवणे आणि शुद्धतेबद्दल माहिती देणे हा होता. सरकारी कागदपत्रांमध्ये असेही नमूद आहे की, हॉलमार्किंगमुळे ग्राहक फसवणुकीपासून सुरक्षित राहतात आणि घोषित केलेली शुद्धता त्यांना मिळते. पण जर 81 % दुकानांची वार्षिक तपासणीच होत नसेल, तर HUID-प्रमाणित दागिन्यांच्या शुद्धतेची हमी कोण देत आहे? असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.
कॅगचा हा मसुदा अहवाल अद्याप संसदेत सादर व्हायचा आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून अंतिम प्रतिसाद मिळाल्यानंतर तो सादर केला जाणार आहे. त्यामुळे जोपर्यंत BIS ची देखरेख मजबूत होत नाही, तोपर्यंत सोने खरेदी करताना केवळ हॉलमार्कवर अवलंबून न राहता HUID तपासा, बिल जपून ठेवा आणि शंका असल्यास BIS ॲपवरदेखील तपासा.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
प्रत्येक हॉलमार्क दागिन्यावर 6 अंकी अल्फान्यूमेरिक HUID नंबर असतो. तो दागिन्यावर स्पष्ट दिसतोय का ते पहा. खरेदी करताना ‘BIS Care’ या सरकारी मोबाईल ॲपवर तो HUID नंबर टाकून दागिन्याची शुद्धता आणि ज्वेलरची माहिती तात्काळ व्हेरिफाय करा. तसेच कोणत्याही परिस्थितीत जीएसटी असलेले पक्के बिल घ्यायला विसरू नका, ज्यावर दागिन्याचे वजन, कॅरेट आणि HUID क्रमांक नमूद असेल.