मोदींच्या विद्यार्थ्यांना माफ करा आवाहनावर अभिजीत दिपकेंचा सवाल; फक्त रीलवर माफी की गुन्हेही मागे घेणार?

गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना शिवीगाळ करणाऱ्या आयटी सेलच्या सदस्यांवरही एफआयआर दाखल होणार का? असंही ते म्हणाले.

News Photo   2026 08 01T152950.810

जंतरमंतर येथील आंदोलनादरम्यान (MODI) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना माफ करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, या भूमिकेवर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

पंतप्रधानांनी शुक्रवारी इन्स्टाग्राम आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सामाजिक माध्यमांवर सेल्फी शैलीतील व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओत त्यांनी जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबरच त्यांच्या दिवंगत आईबाबतही अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचं सांगितलं. अशा प्रकारची भाषा कोणत्याही सुसंस्कृत समाजाला शोभणारी नसल्याचं त्यांनी नमूद केलं.

कायद्याचा पेपरफुटी रोखण्याऐवजी त्यानंतरच्या कारवाईवरच भर; सीजेपीचे अभिजीत दिपकेंना वेगळाच संशय

तथापि, विद्यार्थ्यांकडून चुका होऊ शकतात, त्यांना शिक्षा देण्याऐवजी योग्य मार्गदर्शन करून सुधारण्याची संधी दिली पाहिजे, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. न्यायालयीन प्रक्रिया, सामाजिक बहिष्कार किंवा दीर्घकाळ चालणारी कायदेशीर कारवाई परिस्थिती सुधारू शकत नाही. मी त्यांना माफ करू इच्छितो. समाजानेही त्यांना स्वीकारावं, असं आवाहन त्यांनी केलं. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, फ्रेंड्स, फक्त रीलवरच माफ करणार की त्यांच्यावरील गुन्हेही मागे घेणार? असा सवाल उपस्थित केला.

यापूर्वीही दिपके यांनी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयावर टीका केली होती. त्यांनी कायद्याची निवडक अंमलबजावणी होत असल्याचा आरोप करत, भाजपच्या आयटी सेलशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या काही सोशल मीडिया खात्यांकडून महिलांविरोधात सातत्याने आक्षेपार्ह भाषा वापरली जाते, त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

दिपके यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत, जर शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करायचे असतील, तर सर्वाधिक गुन्हे भाजपच्या आयटी सेलच्या सदस्यांवर आणि महिलांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या नेत्यांवर दाखल व्हायला हवेत,” असे म्हटलं आहे. तसंच, संसदेतही अनेक नेत्यांनी अयोग्य भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने एक्सवरील पोस्टमध्ये, “गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना शिवीगाळ करणाऱ्या आयटी सेलच्या सदस्यांवरही एफआयआर दाखल होणार का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

याआधीही पंतप्रधानांनी परीक्षा सुधारणा व पेपरफुटीविरोधी नव्या कायद्याबाबत व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केल्यानंतर दिपके यांनी इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया देताना, देशाच्या भविष्यापेक्षा तुमच्या चेहऱ्याची चमक अधिक दिसते, अशी टीका केली होती. पंतप्रधानांनी मात्र या कायद्याला देशाच्या परीक्षा व्यवस्थेला अधिक सक्षम बनविणारे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले होते.

follow us