थलापती विजय यांच्या दरबारातून ज्योतिषाची एक्झिट; स्वतःचं ‘भविष्य’ ओळखण्यात पंडितजी फेल!
CM Vijay तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री 'थलपती' जोसेफ विजय यांनी राजकारणात येताच एक मोठा 'क्लायमॅक्स' दाखवला आहे.
CM Vijay Astrologer Rickey Radhan Pandit Vettrivel Removed From OSD Post : तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री ‘थलपती’ जोसेफ विजय यांनी राजकारणात येताच एक मोठा ‘क्लायमॅक्स’ दाखवला आहे. ज्या ज्योतिषाने विजय यांच्या ‘सुनामी विजयाची’ भविष्यवाणी केली होती, त्याच ज्योतिषाला ओएसडी (OSD) पदावर बसवून 24 तास उलटत नाहीत तोच, मुख्यमंत्री विजय यांनी त्यांना पदावरून हटवले आहे. विशेष म्हणजे, जगाचं भविष्य वर्तवणाऱ्या या ज्योतिषाला स्वतःची खुर्ची एका दिवसात जाणार आहे, याचा पत्ताच लागला नाही.
‘कोणी डॉक्टर तर कोणी अभिनेता’; मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळात या चेहऱ्यांचा समावेश
नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी मंगळवारी त्यांचे खासगी ज्योतिषी आणि आध्यात्मिक सल्लागार पंडित रिकी राधा वेत्रीवेल यांची मुख्यमंत्री कार्यालयात ‘ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी’ (OSD) म्हणून नियुक्ती केली होती. रिकी राधा हे विजय यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. शपथविधीची वेळ असो वा पक्षाचे मुहूर्त, सर्व काही राधा यांच्या सल्ल्यानेच ठरत असे. मात्र, या नियुक्तीनंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला.
विरोधकांचा आणि मित्रपक्षांचा ‘प्रहार’
विजय यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांनीच (VCK, CPI, CPIM) या नियुक्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासायला हवा की अंधश्रद्धा? असा सवाल विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विरोधकांनी तर या प्रकाराची तुलना थेट माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या ज्योतिषांवरील अवलंबित्वाशी करायला सुरुवात केली.
ज्योतिषाचे ग्रह फिरले
एकीकडे मुख्यमंत्री विजय विधानसभेत ‘फ्लोर टेस्ट’ (बहुमत चाचणी) पास झाले, पण दुसरीकडे त्यांच्या ज्योतिषाचे ग्रह मात्र फिरले. मित्रपक्षांचा वाढता दबाव पाहून मुख्यमंत्री विजय यांनी बुधवारी सकाळीच पंडित रिकी राधा यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश दिले.
राजकीय रणनीतीकार म्हणून देशभरात काम आणि आता मंत्री; कोण आहेत टीव्हीकेच्या युवा नेत्या एस. कीर्तना?
“दुसऱ्यांचं काय, स्वतःचंच भविष्य पाहता आलं नाही”
या प्रकरणावर AIADMK चे खासदार आय.एस. ईनाबदुरई यांनी सणसणीत टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “पंडित रिकी राधा दुसऱ्यांचे भविष्य बघतात, पण त्यांना स्वतःचे भविष्य मात्र बघता आले नाही. त्यांची नियुक्ती 24 तास सुद्धा टिकली नाही, यावरूनच विजय सरकारच्या वाईट दिवसांची सुरुवात झाली आहे हे स्पष्ट होते.”
भविष्यवाणी खरी ठरली, पण पद टिकले नाही
पंडित रिकी राधा यांनी निवडणुकीच्या एक वर्षापूर्वीच ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाच्या ऐतिहासिक विजयाची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली. पण ‘सरकारी अधिकारी’ म्हणून त्यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात आली. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे की, “जो दुसऱ्यांचे ग्रह ताऱ्यांची दिशा सांगतो, त्याला स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी कोणतेच नक्षत्र कामी आले नाही असाच सूर राजकीय वर्तुळात उमटू लागला आहे.