पहलगाममध्ये ते दहशतवादी घुसलेच कसे?, काँग्रेसच्या रंजन गोगोईंकडून सरकारवर थेट प्रश्नांचा भडीमार

Gaurav Gogoi on Pahalgam Attack In Lok Sabha : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज सोमवार (दि. 28 जुलै)रोजी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेची सुरुवात केली. (Pahalgam) त्यांनी सरकारची बाजू मांडली. त्यानंतर काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी सरकारला अनेक थेट प्रश्न विचारले. यावेळी सत्ताधाऱ्यांमध्ये मोठी शांतता पसरल्याचं वातावरण निर्माण झालं होतं.
सरकारने हे का सांगितलं नाही की, पहलगाम दहशतवादी हल्ला कसा झाला आणि दहशतवादी कसं घुसले? गोगोई म्हणाले की, सरकार 2016 मध्ये जी विधाने करत होती, तीच विधाने आता पुन्हा करत आहे. पुलवामा हल्ल्यानंतरही अशीच विधाने करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूरवर बोलताना गौरव गोगोईंनी विचारलं की, राजनाथ सिंह म्हणालं की, “आमचा उद्देश युद्ध नव्हता, तर का नव्हता? आपण पाकव्याप्त काश्मीर कधी घेणार? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
उरी हल्ला हा सर्वात वेदनादायक हल्ला होता. उरी आणि पुलवामानंतर पहलगाममध्ये सर्वात भयानक हल्ला झाला आहे. “पाकिस्तानची इतकी हिंमत कशी झाली की तो वारंवार हल्ले करत आहे?” गौरव गोगोई म्हणाले की, पहलगाम हल्ल्याला 100 दिवस उलटून गेले आहेत. परंतु, हे सरकार दहशतवाद्यांना न्यायाच्या कचाट्यात आणू शकलेलं नाही. तसंच, ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्याबाबत केंद्र सरकार उपराज्यपालांच्या मागं लपू शकत नाही, असा थेट हल्लाबोलही त्यांनी केला.
ऑपरेशन सिंदूर वरील चर्चेदरम्यान, काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘शेवटी, पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कोण घेतो? जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल. जर कोणाला जबाबदारी घ्यायची असेल, तर ती केंद्रीय गृहमंत्री यांनी घ्यावी. केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्र सरकार उपराज्यपालांच्या मागं लपू शकत नाहीत. असा टोला ही त्यांनी या चर्चेवेळी सरकारला लगावला.
पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाहून परतले, पण त्यांनी पहलगामला भेट दिली नाही. त्यांनी एका सरकारी कार्यक्रमात भाग घेतला आणि बिहारमध्ये एका राजकीय सभेला संबोधित केले. जर कुणी पहलगामला गेले असेल, तर ते आमचे नेते राहुल गांधी होते.” असं ही ते यावेळी म्हणाले. दरम्यान यापूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “कोणत्याही दबावामुळे ऑपरेशन सिंदूर थांबवले गेले हे म्हणणे चुकीचे आहे.
ऑपरेशन अभियान फक्त थांबवले जात आहे, जर भविष्यात पुन्हा काही दुस्साहस झाले, तर अभियान पुन्हा सुरू होईल, असं गोगई यांच्या आधी राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं. त्यासोबतच संरक्षण मंत्री म्हणाले की, विरोधी पक्षाचे लोक विचारतात की, “किती विमाने पडली?” हे राष्ट्रीय भावनांचे योग्य प्रतिनिधित्व करत नाही, तर त्यांचा प्रश्न हा असायला हवा की, दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले का? असंही ते म्हणाले.