Cotton and Climate change : भारत-पाकिस्तानसह भारतीय उपखंडातील कापूस लागवड धोक्यात !
हवामान बदलाचा फटका (climate change) कापसासारख्या नगदी पिकाला बसतोय. भारत–पाकिस्तानसह (India-Pakistan) भारतीय उपखंडातले वास्तव विदारक आहे. उत्पादनापासून निर्यातीपर्यंत शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी कापूस लागवडही (cotton) धोक्यात आली आहे. अमेरिकेतील ईस्ट–वेस्ट सेंटरने नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वर्कशॉपमध्ये याची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार व फोकस इंडियाचे सहसंपादक सकृत करंदीकर यांनी याबाबत एक विस्तृत लेख लिहिला आहे.
2022 हे वर्ष तामिळनाडूतील शेतकरी अनंत कुमार पिचाई पिल्ले यांच्या कायम वाईट अर्थाने स्मरणात राहील. कारण याच वर्षी त्यांनी गेल्या आठ वर्षात जे केले नव्हते, ते त्यांना करावे लागले. त्यांनी कापूसच आपल्या शेतात लावला नव्हता. जानेवारी 2021 मध्ये तामिळनाडूत प्रचंड वृष्टी झाली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे सगळे स्वप्न वाहून गेले. अनंत कुमारांच्या गावातले 70 शेतकरी त्यावर्षी कापूस लागवड करू शकले नाहीत. गेल्या 100 वर्षांत जानेवारी महिन्यात 2021मध्ये पडल्यासारखा पाऊस पडला नव्हता. त्या पावसाने होत्याचे नव्हते केले. त्यामुळे 70 शेतकऱ्यांनी कापूस पीक घेतलेच नाही, असे अनंत कुमार यांनी सांगितले. जानेवारीत कधीही पडत नाही, त्याच्या दसपट पाऊस पडून गेल्याची माहिती नंतर हवामान खात्याने दिली.
एन. गणेशन या शेतकऱ्याने पण सहा वर्षांपूर्वीच कापूस पिकाची लागवड सोडून दिली आहे. तीव्र उन्हाळा आणि मुसळधार अवकाळी पाऊस याने शेतकरी वैतागून कापूस लागवड सोडून देत असल्याचे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले आहे. जगातले हवामान बदल वगैरे मला काही माहिती नाही. पण तीव्र ऊन आणि मुसळधार पाऊस कापूस पीक सहन करू शकत नाही. त्यामुळे मी त्याची लागवड सोडून दिली आणि मक्याकडे वळलो आहे, असे ते म्हणाले आहेत.
Live Update : लोकांना विकत घेतलं, सरकार पाडलं गेलं. गुवाहटीत बसून नोटिसा काढल्या – कपिल सिब्बल
जे भारतात 2021 मध्ये घडले आहे. तेच पाकिस्तानात ऑगस्ट 2022 मध्ये घडले. प्रचंड पावसाने आणि हवामान बदलामुळे पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात 80 % कापूस पिकाचे नुकसान झाले. 1700 लोक मृत्युमुखी पडले. कापूस पिकाचे 15 अब्ज डॉलर्सचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. पाकिस्तानी विणकर असोसिएशनने या नुकसानी प्रमाण आकडेवारीत सांगितले. 2023 च्या आर्थिक वर्षात पाकिस्तानला 3.1 दशलक्ष गाठी कापूस आयात करावा लागला असता. त्याची किंमत 1.2 अब्ज डॉलर्स आहे.
कापूस पिकाला समशीतोष्ण हवामान लागते. मान्सूनचा कापसाला फायदा जरूर होतो. पण पिकाच्या वाढीला कोरडे हवामान लागते. पण सध्या तीव्र उन्हाळा आणि तीव्र पावसाळा यामुळे कापूस पिकाचे संपूर्ण नियोजनच कोलमडून पडले आहे. या संदर्भात भारतीय हवामान शास्त्र विभागाचे माजी उपसंचालक वाय. इ. ए. राज यांनी गंभीर इशारा दिला आहे. कोणताही पीक पॅटर्न आणि हवामान याचा अंदाज केवळ शॉर्ट टर्ममध्ये बांधू नये, तर पावसाच्या किमान 10 वर्षाच्या पॅटर्नचा अभ्यास करून मगच पीक नियोजन करावे. अन्यथा दरवर्षी मोठे नुकसान सोसावे लागेल. शेती उत्पादनावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
काठमांडूच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटन डेव्हलपमेंटचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ अबिद हुसेन यांनी देखील पाकिस्तानातल्या कापूस उत्पादकांनी पंजाबमध्ये गेल्या 5 वर्षात कापूस लागवड आणि उत्पादन थांबवल्याची माहिती दिली आहे. याचे कारणही तीव्र हवामान बदलातच सापडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संस्थेने अफगाणिस्तान बांगलादेश भूतान, चीन, भारत, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तान यांच्यातील कापूस उत्पादनाचा विशेष अभ्यास केला आहे.
भारत आणि पाकिस्तान हे गेल्या हजारो वर्षांपासून कापूस उत्पादनात आघाडीवर होते. या देशातील कापूस निर्यातदार देशांमध्ये अमेरिका, चीन, ब्राझील अशा पहिल्या पाच क्रमांकाच्या देशांमध्ये समावेश आहे. भारताची कापूस निर्यात तर जगाच्या 26 % आहे. भारताची 6 कोटी लोकसंख्या कापूस शेतीवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अवलंबून आहे.
पाकिस्तानातला एकूण उत्पादनातला निम्मा भाग हा कापसाशी संबंधित आहे. पाकिस्तानी जीडीपीतील 11 % भाग कापूस उत्पादनाशी संबंधित आहे. पण आता ही सगळी कापूस शेती केवळ टोकाच्या तीव्र हमावानामुळे धोक्यात आली आहे.
महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आर्वी खुर्दचे विक्रम पाटील गायकवाड हे कापूस उत्पादक शेतकरी आहेत. ठिबक सिंचनाद्वारे ते 4 ते 6 एकरात कापूस पीक घेतात. परंतु, त्यांनाही तीव्र हवामानाचा सामना करावा लागत असल्याने यंदा 2023 मध्ये कापूस उत्पादन घटण्याची भीती वाटते. सततचे ढगाळ वातावरण अथवा पावसामुळे कापूस वाढीसाठी कोरडे हवामानाच राहत नाही. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विक्रम गायकवाड हे एकरामध्ये दर एकरी 22 ते 23 क्विंटल कापूस उत्पादन घेत होते. पण आता हेच प्रमाण एकरी 8 ते 10 क्विंटल एवढे घटेल, अशी भीती त्यांना वाटते. ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढते. इतकेच नाही तर पावसामुळे शेताला घातलेले खतही वाहून जाते. त्यामुळे कापूस रोपांपासून ते प्रत्यक्ष वाढीपर्यंत उत्पादनाचे प्रमाण सातत्याने घटत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
2023 मध्ये चीन आणि बांगलादेशातून कापसाची मागणी वाढू शकते. त्यामुळे कापसाला 10000 रुपये क्विंटल भाव मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. देशांतर्गत भावही वाढू शकतात. पण मूळातच उत्पादन कमी झाल्याने फार मोठा लाभ शेतकऱ्यांना होण्याची शक्यता कमी आहे, असेही विक्रम गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
लहरी आणि तीव्र हवामानाचा फटका पाकिस्तानी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला. कापसाच्या 3.5 दशलक्ष गाठी सिंधमधील पुरात वाहून गेल्याचे सिंध अब्दागार बोर्डाचे चेअरमन मेहमूद नवाज शाह यांनी सांगितले आहे. पाणीटंचाईमुळे कापसाचे लागवड क्षेत्र 0.4 दशलक्ष एकराने घटल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
मध्य प्रदेशातल्या बुऱ्हानपूर मधल्या किशोर पाटील या कापूस उत्पादक शेतकऱ्याची कहाणीही वेगळी नाही. किशोर पाटील गेल्या दहा-बारा वर्षांपासून कापूस उत्पादन घेतात ते मे महिन्यात शक्यतो कापूस लागवड करतात त्या महिन्यात पाऊस कमी असल्याचा लाभ सुरुवातीला मिळतो. पण लहरी हवामानामुळे उत्पादन घटण्याचा धोका आहे. हे दर एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन राहील आणि कापसाचा भाव देखील साधारण 8100 रुपये राहील. त्यामुळे मोठ्या लाभाची अपेक्षा कमीच असल्याचे किशोर पाटलांनी स्पष्ट केले आहे.
बदलते हवामान त्यातही तीव्र उन्हाळा तीव्र पावसाळा याचा फटका एकूणच भारतातल्या पीक पॅटर्नला बसल्याचे दिसत आहे. अनेकांनी व्यक्तिगत अनुभवातून आणि सामुदायिक अनुभवातून स्थानिक पातळीवर पीक पॅटर्न बदलल्याचे दिसत आहे. पण याचा एकूण परिणाम शेतीच्या विविध उत्पादनावर प्रतिकूल झाला आहे. काही शेतकरी कापसाकडून तांदुळाकडे वळले आहेत, तर काहीजण काहीजण मका पिकाकडे. मका पीक हवामान बदल कापसापेक्षा जास्त प्रमाणात सहन करू शकते, असे पंजाब मधल्या शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे. याला डॉ. डी. के. राठीनवाल यांनी दुजोरा दिला आहे. पण त्यांनी बदलत्या पीक पॅटर्नचा धोकाही स्पष्ट केला आहे. बदलत्या हवामानाचा कल लक्षात घेऊन दीर्घकालीन उपाय योजना सांगण्यासाठी आणखी 30 वर्षांच्या अभ्यासाची आणि अनुभवाची गरज असल्याचे डॉ. राठीनवाल यांनी आवर्जून नमूद केले आहे. (पाकिस्तानमधील कापसाच्या परिस्थितीबाबत पत्रकार गुलाम मुस्तफा, अलिना तारिफ,तर तामिळनाडूमधील कापूस परिस्थितीबाबत चेन्नई येथील पीर महमंम आझीझी यांच्याही मदत त्यांनी घेतली आहे)