UPI Payment : आता UPI द्वारे करा 10 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट; नवीन नियम आजपासून लागू
NPCI ने UPI पेमेंटच्या मर्यादेत वाढ करून आता दहा लाख रुपये प्रतिदिन अशी केली आहे.

UPI Payment Limit Increased : केंद्र सरकारने यूपाआयच्या नियमांत मोठा बदल केला आहे. NPCI ने UPI पेमेंटच्या मर्यादेत वाढ करून आता दहा लाख रुपये प्रतिदिन अशी केली आहे. यासह अन्य काही कॅटेगरीतही पेमेंट लिमिटमध्ये बदल केले आहेत. आजपासून या नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. याआधी यूजर दर दिवासाला 2 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकत होता. आता मात्र लिमिट वाढवण्यात आले आहे. या नव्या बदलांचा परिणाम थेट सर्वसामान्य माणसांवर होणार आहे. कारण सरकारचे हे बदल देशातील सर्वसामान्य व्यापारी, क्रेडिट कार्ड पेमेंट आणि ज्वेलरी खरेदीशी संबंधित आहेत. परंतु, यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रकारच्या पेमेंटच्या नियमांत बदल झालेला नाही.
UPI च्या माध्यमातून पेमेंटच्या (UPI Payment Limit Increased) मर्यादेत वाढ करण्यामागे खास कारण आहे. सरकारने हा निर्णय काही खास पर्सन टू मर्चंट देवाणघेवाणीत वाढ करण्याच्या उद्देशाने घेतला आहे. पर्सन टू पर्सन पेमेंटच्या मर्यादेत कोणताही बदल केलेला नाही.
पर्सन टू पर्सन आणि पर्सन टू मर्चंट
कोणत्या कॅटेगरीमध्ये पेमेंटच्या लिमिटमध्ये काय बदल झाला आहे याची माहिती घेण्याआधी पर्सन टू पर्सन आणि पर्सन टू मर्चंट या संकल्पना काय आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. पर्सन टू मर्चंटचा सरळ अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यापाऱ्याला केलेले पेमेंट. या पेमेंटची मर्यादा आधी दोन लाख रुपये प्रति दिवस अशी होती. आता यात आठ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच एखादा व्यक्ती एखाद्या व्यापाऱ्याला एका दिवसात दहा लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतो.
जर एखादा व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवत असेल तर त्याला पर्सन टू पर्सन म्हटले जाते. याची मर्यादा आधी एक लाख रुपये होती आताही तितकीच आहे. यात कोणताही बदल झालेला नाही.
UPI down : गुगल पे, फोन-पे सेवा विस्कळीत, ऑनलाईन पेमेंट करताना युजर्संना अडचणी
युपीआय अंतर्गत दागिने खरेदीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता तुम्ही प्रति व्यवहार दोन लाख रुपयांपर्यंत आणि 24 तासांत 6 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकता.
प्रवासाशी संबंधित बुकिंगसाठी तुम्ही युपीआयच्या माध्यमातून एकावेळी 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकता. 24 तासांत असे तुम्ही एकूण दहा लाख रुपयांपर्यंत देवाणघेवाण करू शकता. म्हणजेच तुम्ही विमान आणि रेल्वे तिकिटासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट युपीआय द्वारे करू शकता.
कर्ज रिपेमेंट करण्यासाठी प्रति ट्रांझॅक्शन लिमिट 5 लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच 24 तासांत तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत लोन रिपेमेंट करू शकता.
शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड यांसारख्या ठिकाणी पैसे गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एकावेळी पाच लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवू शकता. तसेच 24 तासांत 10 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट करू शकता.
क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी प्रति व्यवहार 5 लाख रुपयांपर्यंत लिमिट निश्चित करण्यात आले आहे. 24 तासांसाठी 6 लाख रुपयांपर्यंत लिमिट आहे. याआधी ही मर्यादा 2 लाख रुपये होती.
विमा हप्ता भरण्यासाठी पेमेंट लिमिट 5 लाख रुपये करण्यात आली आहे. 24 तासांत 10 लाख रुपये लिमिट असेल. डिजिटल अकाउंट सुरू करताना या खात्यात सुरुवातीला पैसे जमा करण्यासाठी पाच लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
डिजिटल पेमेंटमध्ये भारताची भरारी, UPI-आधारित व्यवहारांनी ओलांडला 700 दशलक्ष व्यवहारांचा टप्पा