आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल; अंदमान समुद्रातून ऊर्जा संपत्तीचा शोध
या नव्या शोधामुळे देशांतर्गत उत्पादन वाढण्यास मदत होणार असून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
Discovery of energy resources in the Andaman Sea : आखाती देशांमधील वाढत्या संघर्षामुळे जगभरात इंधन सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच भारतासाठी एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अंदमान समुद्रात नैसर्गिक वायूचा साथ सापडला असून, भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे. ऑइल इंडिया लिमिटेडने अंदमान समुद्रात नैसर्गिक गॅसचा शोध लावला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.
या शोधामुळे भारताच्या खोल समुद्री ऊर्जा संशोधनाला नवी दिशा मिळणार असून देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मोठे बळ मिळणार आहे. यापूर्वी 2025 मध्ये विजयापुरम -2 या विहिरीत देखील नैसर्गिक गॅसचा शोध लागला होता. विशेष म्हणजे त्या गॅसमध्ये तब्बल 87 टक्के मिथेन आढळून आले होते, जे व्यावसायिकदृष्ट्या उच्च दर्जाचे मानले जाते. आता सलग मिळालेल्या या यशामुळे अंदमान बेसिनकडे ऊर्जेचे महासागर म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समुद्र मंथन मिशनअंतर्गत खोल समुद्रातील खनिज आणि ऊर्जा संसाधनांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या मोहिमेचा उद्देश देशातील उपलब्द्ध नैसर्गिक संपत्तीचा शोध घेऊन ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवणे हा आहे. अंदमान समुद्रातील हा नवा शोध त्या दिशेने महत्वाचा टप्पा ठरत आहे. सध्या भारत नैसर्गिक गॅसच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. मात्र, या नव्या शोधामुळे देशांतर्गत उत्पादन वाढण्यास मदत होणार असून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
तुकाराम मुंढेंच्या रडारवर वडापाव व्यावसायिक; वर्तमानपत्रातील पॅकिंगवर एफएसएसएआयची कडक भूमिका
केंद्र सरकारने 2030 पर्यंत देशाच्या ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक गॅसचा वाट 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्धीष्ट ठेवले आहे. सध्या हा वाटा केवळ 6 ते 7 टक्क्यांच्या आसपास आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार अंदमान बेसिनमध्ये सुमारे 371 मिलियन टन हायड्रोकार्बन संसाधने असू शकतात. अर्थात या साठ्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू होण्यासाठी अजून काही वर्षे लागू शकतात. त्यासाठी पुढील चाचण्या, मूल्यांकन आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम करावे लागणार आहे.
या शोधाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, अंदमान बीएससींमध्ये हायड्रोकार्बनचा शोध लावणे ही दीर्घकाळापासून व्यक्त होत असलेल्या विश्वासाची पुष्टी आहे. म्यानमार ते इंडोनेशियापर्यंतच्या प्रदेशात लागलेल्या शोधांशी हा शोध सुसंगत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. एकूणच, अंदमान समुद्रात सापडलेला हा नैसर्गिक वायूचा साठा अद्याप प्राथमिक टप्प्यात असला तरी भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी, इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारतच्या उद्दीष्टाला गती देण्यासाठी तो अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.