Rahul Gandhi : अदानींच्या मुद्द्यावर उत्तर द्यावे लागू नये म्हणून हे प्लॅनिंग, राहुल गांधींवरील कारवाईवर प्रियंका भडकल्या
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना 23 मार्चला दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
या कारवाईवर कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी आपला भाऊ राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द केल्याने भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे. शुक्रवार, 24 मार्चला दिल्लीत कॉंग्रेस मुख्यालयात पक्षाची उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रियंका गांधींनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, अदानींच्या मुद्द्यावर उत्तर द्यावे लागू नये म्हणून राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचं प्लॅनिंग करण्यात आलं आहे.
पुढे प्रियंका म्हणाल्या, ‘भाजपचे प्रवक्ते असो, मंत्री असो, खासदार असो, स्वतः पंतप्रधान असो सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या परिवाराबद्दल, राहुलजी बद्दल माझे वडिल, आई, इंदिरा जी आणि पंडित नेहरूंबद्दल काही ना काही वक्तव्ये करत असतात. हे खूप जुनं आहे. पुर्ण देशाला माहीत आहे. त्यांना नाही कधी शिक्षा होत. त्यांच्यावर नाही कधी कारवाई होत.’ असं यावेळी प्रियंका म्हणाल्या.
कोणतीही किंमत मोजायला तयार, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
तसेच त्या म्हणाल्या माझ्या भावाने काय केले ? अदानींचा मुद्दा उचलंला, त्यावर प्रश्न विचारले. त्यामुळे हे सगळं झालं. ज्या केसच्या तक्रारदाराने स्वतः एक वर्षाचा स्टे मागितला होता. पण राहुल यांनी अडानींच्या मुद्द्यावर भाषण केल्यानंतर अचानक ही केस पुन्हा सुरू करण्यात आली. अदानींच्या मुद्द्यावर उत्तर द्यावे लागू नये म्हणून राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचं प्लॅनिंग करण्यात आलं आहे. असा आरोप यावेळी कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी केला आहे.