तिरुपती लाडूसाठीच्या तुपात पाम ऑइल, पामोलिन आणि रसायनांची भेसळ; EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक

Tirupati Laddu Adulteration : तूप उत्पादक कंपनी ‘सुकृती फूड्स’चे प्रवर्तक कैलास चंद मंगला यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 19T140900.132

Tirupati Laddu Adulteration : तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादासाठी वापरण्यात येणारे तूप भेसळयुक्त असल्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. तूप उत्पादक कंपनी ‘सुकृती फूड्स’चे प्रवर्तक कैलास चंद मंगला यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. EDच्या हैदराबाद कार्यालयाने 17 सप्टेंबर रोजी ही कारवाई केली. त्यांना विशाखापट्टणम येथील विशेष PMLA न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

EDच्या तपासानुसार, तिरुपती लाडू प्रसादासाठी वापरण्यात आलेले भेसळयुक्त तूप रिफाइंड पाम ऑइल, पाम कर्नेल ऑइल, पामोलिन तसेच MG-90, मोनोग्लिसराइड्स, Myvacet Soft 400 आणि अॅसिटिक अॅसिड एस्टर यांसारख्या विविध रसायनांचा वापर करून तयार करण्यात आले होते. हे भेसळयुक्त तूप ‘Agmark Special Grade Cow Ghee’ असल्याचे भासवून तिरुमला तिरुपती देवस्थानमला (TTD) पुरवण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

Tirupati Temple : तिरुपती मंदिरातील चार कर्मचारी तडकाफडकी निलंबित; कारणही धक्कादायक

EDने दिलेल्या माहितीनुसार, 2019 ते 2024 या कालावधीत TTDला करण्यात आलेल्या कथित बनावट तूप पुरवठ्याची किंमत सुमारे ₹230 कोटी होती. यापैकी ₹96 कोटी किमतीचे भेसळयुक्त तूप कैलास चंद मंगला यांनी तयार केल्याचा EDचा दावा आहे. या प्रकरणात मंगला हे सहआरोपी असून त्यांनी भेसळीसाठी लागणाऱ्या घटकांची खरेदी करून आपल्या कारखान्यात भेसळयुक्त तूप तयार केल्याचे तपासात समोर आल्याचे EDने म्हटले आहे.

तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, श्री वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज, मालगंगा मिल्क अँड अॅग्रो प्रॉडक्ट्स आणि ए.आर. डेअरी फूड्स यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून भेसळयुक्त तुपाचा पुरवठा करण्यात समन्वय साधण्यात आला. तसेच तूप आणि रिफाइंड पाम ऑइलच्या खरेदी-विक्रीशी संबंधित बनावट नोंदी तयार करून भेसळयुक्त घटकांचा प्रत्यक्ष वापर लपविण्याचा आणि अस्सल गायीचे तूप तयार केल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा EDचा आरोप आहे. यापूर्वी याच प्रकरणात ‘भोले बाबा ऑर्गॅनिक डेअरी मिल्क’चे प्रवर्तक आणि संचालक विपिन जैन यांनाही अटक करण्यात आली आहे.

follow us