Samsung Employees Strike : चेन्नईतील प्लांटवर 9 सप्टेंबरपासून सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप महिना उलटून गेल्यानंतरही संपलेला नाही. मंगळवारी पोलिसांनी 900 हून अधिक संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक केल्याने या प्रकरणाला नवं वळण लागलं. (Samsung) यामुळे कंपनी आणि कर्मचारी यांच्यातील परिस्थिती आणखीनच बिघडल्याचं दिसून येत आहे. रस्त्यावर आंदोलन केल्याने या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांची सुटका झाल्याची माहितीही समोर आली आहे.
सर्व प्रयत्न केले
गेल्या काही वर्षांतील हा देशातील सर्वात मोठा संप मानला जात आहे. या प्लांटमध्ये कंपनी रेफ्रिजरेटर, टीव्ही आणि वॉशिंग मशिनसारखी उत्पादने बनवते. सणासुदीपूर्वी सुरू झालेल्या या संपामुळे कंपनीच्या महसुलाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सर्व प्रयत्न करूनही तोडगा निघताना दिसत नाही. आपले वेतन वाढवावे, कामाचे तास सुधारावेत, त्यांच्या युनियन ‘सिटू’ला कंपनीने मान्यता द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
हल्ली अर्थ समजेनासा झालाय; महात्मा गांधींचा उल्लेख करत राज ठाकरेंची वाचाळवीरांना फटकार
सॅमसंगच्या 912 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. या संपात सुमारे एक हजार कर्मचारी सहभागी आहेत. सॅमसंगच्या या प्लांटमध्ये सुमारे 1800 कर्मचारी काम करतात. यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी पोलिसांनी 104 जणांना ताब्यात घेतलं होतं. सॅमसंगने या विषयावर सध्या काहीही सांगितलेलं नाही. मात्र, या भागातील इतर कंपन्यांच्या तुलनेत आम्ही लोकांना जवळपास दुप्पट पगार देत आहोत, असं त्यांनी सांगितले होतं. तसंच कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न ऐकून सोडवण्यास आम्ही तयार आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्लांटमध्ये काम चालू
याआधी संप थांबवण्यासाठी कंपनीने न्यायालयातही धाव घेतल्याची माहिती समोर आली होती. यासोबतच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या संपामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया व्हिजनलाही मोठा फटका बसला आहे. सध्या सॅमसंगसाठी ही दिलासादायक बाब आहे की त्यांच्या उत्तर प्रदेशात असलेल्या स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये काम चालू आहे. उत्पादनाला गती देण्यासाठी कंपनीने काही कंत्राटी कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींचीही भरती केल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे.