गोळीबाराच्या घटनेत नवा ट्विस्ट; खान सरांविरुद्ध एफआयआर दाखल, दोन्ही सुरक्षा रक्षकांना अटक

खान ग्लोबल स्टडीजच्या कॅम्पसमध्ये विटा आणि दगडफेक झाली, जाहिरात फलकांची तोडफोड झाली आणि एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली.

Khan Sir

संपूर्ण देशभरात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असलेले (Teacher) शिक्षक आणि यूट्यूबर ‘खान ग्लोबल स्टडीज’चे संचालक फैसल खान उर्फ ​​खान सर यांच्या विरोधात कदमकुआं पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार आणि शस्त्र कायद्याशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

कोचिंग कॅम्पसमधील गोंधळ, व्हायरल व्हिडिओ आणि तपासादरम्यान सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. या घडामोडीमुळे प्रकरण अधिकच चिघळले आहे. पोलीस सध्या संपूर्ण घटनेचा तपास करत असून, या घटनेत कोणाची काय भूमिका होती हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

खान सरांच्या कोचिंग संस्थेबाहेर अज्ञातांचा गोळीबार, दोन दिवसांत कोचिंग सेंटर उडवून देऊ म्हणत हल्लेखोरांचा धुमाकूळ

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पटणा कोचिंग प्रकरण आणि गोळीबाराच्या घटनेनंतर खान सर उर्फ फैजल खान यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी पटणा पोलिसांनी खान सर यांच्या दोन्ही सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेत अटक केली आहे.

खान सर काय म्हणाले?

एफआयआरबद्दल काहीही माहिती नाही. घटनेदरम्यान त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी आत्मसंरक्षणासाठी शस्त्रे वापरली होती. मी कायद्याचा आणि पोलीस प्रशासनाचा पूर्ण आदर करतो. त्यामुळं सर्व तपास यंत्रणांना मी पूर्ण सहकार्य करणार आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना जी काही माहिती किंवा मदत लागेल ती मी करणार आहे. या प्रकरणातील सत्य समोर आलं पाहिजे असं खान सर म्हणाले.

प्रकरण काय आहे?

पाटण्यातील कदमकुआं येथील कॅम्पसमध्ये ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांचा एक बॅनर लावण्यात आला होता. काही लोकांनी तो फाडून टाकल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंमधील तणाव वाढला. खान ग्लोबल स्टडीजच्या कॅम्पसमध्ये विटा आणि दगडफेक झाली, जाहिरात फलकांची तोडफोड झाली आणि एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर, खान सरांनी जाहीरपणे दावा केला की त्यांच्या संस्थेबाहेर अनेक वेळा गोळीबार झाला. या वक्तव्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, पाटणा पोलिसांनी सांगितलं की गोळीबाराची अद्याप पुष्टी झालेली नाही. व्हायरल व्हिडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे, खान ग्लोबल स्टडीजच्या दोन सुरक्षा रक्षकांनाही ताब्यात घेण्यात आलं. आता खान सरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

follow us