भाविकांवर काळाचा घाला; नैनितालमध्ये 100 फूट खोल दरीत कार कोसळून लहान मुलासह पाच जणांचा मृत्यू
धैला गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारी एक महिंद्रा कार अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली आणि तब्बल 100 फूट खोल दरीत कोसळली.
Five people including a child died in a car crash : उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यात गुरुवारी दुपारी एक भीषण आणि हृदयद्रावक रस्ता अपघात घडला. भवाली परिसरातील सॅनिटोरियम-रातीघाट बायपास मार्गावरील धैला गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारी एक महिंद्रा कार अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली आणि तब्बल 100 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, UP 32 QU 1874 क्रमांकाची ही कार देवदर्शनासाठी निघाली होती. गुरुवारी दुपारी साधारण दोन वाजण्याच्या सुमारास कार धैला गावाजवळ पोहोचली असता अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच कार खोल दरीत जाऊन कोसळली. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ आणि एसएसबीची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. नैनितालचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. मंजुनाथ टी.सी. यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र खोल दरी, अवघड भूभाग आणि अरुंद रस्त्यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तरीही स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव पथकांनी जीवाची पर्वा न करता दरीत उतरून मृतदेह बाहेर काढले.
आम्ही मोहोळ आहोत, तू कुस्ती कशी करतो ते पाहून घेऊ; हिंदकेसरी वादानंतर महेंद्र गायकवाडांचा गंभीर आरोप
अपघाताचे दृश्य अत्यंत भीषण होते. चक्काचूर झालेली कार आणि दरीत विखुरलेले अवशेष पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात महत्त्वाची मदत केली.
प्राथमिक माहितीनुसार, कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलीस अधीक्षक (गुन्हे) डॉ. जगदीश चंद्र, सर्कल ऑफिसर रविकांत सेमवाल आणि प्रभारी निरीक्षक प्रकाश मेहरा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.