माजी केंद्रीय कायदा मंत्री Adv. Shanti Bhushan यांचे निधन
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) प्रसिद्ध वकील शांती भूषण (Shanti Bhushan) यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले आहे. ते देशाचे कायदा मंत्री (Law Minister) राहिले आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते.
शांती भूषण हे वकिली शिवाय राजकारणातही चर्चेतील नाव होतं. त्यांनी काँग्रेस(ओ) आणि जनता पार्टीच्या माध्यमातूनही राजकारणात स्वत:ला आजमावलं होतं. ते राज्यसभा खासदारही होते. सहा वर्षे ते भाजपामध्ये राहिले होते.
इंदिरा गांधींविरुद्ध राज नारायण यांचा खटला त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात लढवला होता. त्यामुळे इंदिरा गांधींची निवडणूक रद्द झाली होती. त्यानंतर आणीबाणी लागली होती.
शांती भूषण हे मोरारजी देसाई सरकारमध्ये १९७७ ते १९७९ पर्यंत कायदा मंत्री होते. त्यांनी आपल्या आयुष्यात लोककल्यणाशी निगडीत अनेक मुद्दे उचलले होते. भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनातही त्यांचा सहभाग होता.
त्यांनी 2012 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आम आदमी पार्टीची स्थापना केली होती. अॅड. शांती भूषण यांनी आम आदमी पार्टीच्या स्थापनेसाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. नंतर अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्याने शांती भूषण आणि त्यांचा मुलगा प्रशांत भूषण यांनी पक्ष सोडला होता.