BJP : बंगालमध्ये भाजपला धक्का! नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांची पक्षाला सोडचिठ्ठी

BJP : बंगालमध्ये भाजपला धक्का! नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांची पक्षाला सोडचिठ्ठी

BJP : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला (BJP) पश्चिम बंगाल राज्यात आणखी एक झटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यात पक्ष सातत्याने कमकुवत होत आहे. त्यानंतर आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू आणि पश्चिम बंगाल भाजपाचे माजी उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस  (Chandra Kumar Bose) यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे.

भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देतानाच त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. बोस म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे नेतृत्व आणि व्यापक विकास कार्यक्रमांनी प्रेरित होऊन 2016 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी माझा भर बोस बंधुंच्या समावेशी विचारधारेवर होता. याच विचारांना मी देशभरात प्रचारित करेल असेही वाटत होते.

‘सनातन’च्या समर्थनात भाजप मैदानात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना कानमंत्र

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सर्वसमावेशक विचारांचा प्रचार करण्याच्या उद्देशाने भाजपात (BJP) एक आझाद हिंद मोर्चा तयार करण्याचाही निर्णय घेतला. देशाची एकता आणि सर्व समुदायांच्या विकासासाठी ते आवश्यकही होते. मात्र, माझ्या प्रयत्नांकडे राज्य आणि केंद्र या दोन्ही पातळ्यांवर दुर्लक्ष केले गेले. भाजपकडून कोणताच पाठिंबा मिळाला नाही. पश्चिम बंगालमधील लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल याचा एक प्रस्तावही मी ठेवला होता. मात्र माझे प्रस्तावांकडे लक्ष दिले गेले नाही. अशा दुर्दैवी परिस्थितीचा विचार करता येथून पुढे भाजपाचा सदस्य म्हणून काम करणे माझ्याकडून शक्य नाही, अशा शब्दांत चंद्रकुमार बोस यांनी नाराजी व्यक्त केली.

निवडणुकीतील पराभवानंतर भाजप कमकुवत

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून राज्यात भाजपला (BJP) सातत्याने धक्के बसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेल्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा स्वगृही म्हणजेच तृणमूल काँग्रेसमध्ये वापसी केली आहे. त्यामुळे भाजपची वाटचाल जास्त कठीण झाली आहे. भाजप नेत्यांचे राज्यातील दौरेही कमी झाले आहेत. त्याचाही फटका बसत आहे. आता तर भाजपातील दिग्गज नेतेही पक्ष सोडू लागले आहेत. चंद्रकुमार बोस हे त्यातीलच एक नाव. बोस यांनीही भाजपाच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा का देतोय याची कारणेही त्यांनी सांगितली आहेत. यानंतर आता पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘इंडिया’त मिठाचा खडा! ‘या’ राज्यात काँग्रेसशी आघाडी नाही; ‘आप’ स्वबळावरच लढणार

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube