Ghulam Nabi Azad : ‘हिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना, आजचे सर्व मुस्लिम पूर्वीचे हिंदूच’

Ghulam Nabi Azad : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (DPAP) चे संस्थापक गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना आहे आणि आजचे सर्व मुस्लिम पूर्वी हिंदूच होते, असं ते या व्हिडिओत म्हणतांना दिसत आहेत. आझाद यांचा हा व्हिडिओ जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील आहे.
डोडा जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात गुलाम नबी आझाद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलतांना आझाद म्हणाले की, इस्लामचा जन्म 1500 वर्षांपूर्वी झाला होता. भारतात बाहेरचा कोणी नाही. आपण सर्व या देशाचे आहोत. भारतातील मुस्लिम हे मूळचे हिंदू आहेत आणि नंतर त्यांचे धर्मांतर करण्यात आले. 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये फक्त काश्मिरी पंडित होते. मात्र त्यानंतर अनेकांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि मुस्लिम झाल्याचं आझाद म्हणाले.
पती दहशतवादी, पत्नी मानवधिकार मंत्री! यासिन मलिकच्या पत्नीचा पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात समावेश
यावेळी बोलतांना आझाद यांनी धर्माला राजकारणात आणणाऱ्यांचीही त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. ते म्हणाले, राजकारणात धर्म आणू नका. लोकांनी धर्माच्या आधारे मतदान करणे थांबवावे. राजकारणात जो धर्मावर विश्वास ठेवतो तो कमजोर असतो. जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो धर्माचा आधार घेणार नाही. मी पुढे काय करणार, विकास कसा करणार, हे तो व्यक्ती सांगेल. पण, जो दुर्बल आहे तो म्हणेल मला मत द्या, कारण मी हिंदू आहे किंवा मी मुस्लिम आहे, म्हणून मला मत द्या, असंही आझाद यावेळी म्हणाले.
ते म्हणाले, आपण बाहेरून आलो नाही. आपण या मातीत जन्मलो आहोत. याच मातीत आपण गाडले जाऊ. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, काही लोक बाहेरून आले आहेत. माझं म्हणणं आहे की, बाहेरून कोणी आले नाही. हिंदूंमध्ये अंत्यसंस्कार केले जातात आणि अस्थी नदीत सोडल्या जातात. ते पाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाते. तेच पाणी शेतातील पिकांना जाते, म्हणजे आपल्या पोटातही जाते. तसेच या जमिनीवर मुस्लिमांनाही दफन करण्यात आले आहे. त्याचे शरीर या मातीचा भाग बनते. मग हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव का करता? दोन्ही या मातीत मिसळले आहेत. हे सर्व राजकीय द्वंद असल्याचं आझाद म्हणाले.