रामभक्तांनी हुंडीत अर्पण केलेल्या देणगीशी माझा सुरुवातीपासून संबंध राहिलेला नाही: स्वामी गोविंददेव गिरी
Govinddev Giri-श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचा विश्वस्त किंवा कोषाध्यक्ष होण्यासाठी मी कधीही कोणाकडे विनंती केली नाही. कोणताही प्रयत्न केला नाही.
Govinddev Giri On Ram Mandir Donation Controversy: अयोध्येतील श्रीराम मंदिरात भाविकांनी ( Ram Mandir Donation) अर्पण केलेल्या देणग्याच्या कथित चोरी झाल्याच्या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणात आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणावर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे (Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra) कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Govinddev Giri) यांनी रामभक्तांसाठी एक निवेदन काढले आहे. या निवेदनात तब्बल दहा मुद्दे आहेत. देणगी चोरीबद्दल गोविंददेव गिरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हा प्रकार घृणास्पद महापाप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
साधू-संत, महात्मे आणि प्रखर रामभक्त यांच्या अखंड प्रयत्नांमुळे व बलिदानांमुळे श्री अयोध्याधामातील श्रीरामजन्मभूमीच्या पवित्र स्थळी भगवान रामलल्लांचे भव्य मंदिर उभे राहिले. प्रभूंची प्राणप्रतिष्ठा पार पडली आणि ध्वजारोहणापर्यंतची सर्व कामे उत्साहात पूर्ण झाली. हा सोहळा सर्व रामभक्तांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा ठरला. अशा मंगलमय वातावरणात अयोध्या मंदिरात घडलेल्या अभूतपूर्व आर्थिक अपहाराच्या घटनेने सर्व रामभक्तांचे हृदय विदीर्ण झाले आहे. कोट्यवधी भाविकांनी अत्यंत श्रद्धेने रामलल्लांच्या हुंडीत अर्पण केलेल्या धनराशीची मोजणी करताना काही व्यक्तींनी चोरीसारखे घृणास्पद महापाप केल्याचे उघड झाले. तसेच ही चढाव्याची चोरी बराच काळ सुरू असल्याचेही समोर आले आहे. ही घटना प्रत्येक रामभक्तासाठी अत्यंत वेदनादायी, दुःखद आणि लज्जास्पद आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत व्यथित, दुःखी आणि खिन्न आहोत, असे स्वामी गोविंददेव गिरी यांनी निवेदनात म्हटले आहे.
गोविंददेव गिरी यांचे निवेदनातील दहा मुद्दे
1) श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचा विश्वस्त किंवा कोषाध्यक्ष होण्यासाठी मी कधीही कोणाकडे विनंती केली नाही. कोणताही प्रयत्न केला नाही. प्रभू श्रीरामांची कोणत्याही स्वरूपात सेवा करण्याचे भाग्य लाभणे, हेच माझ्यासाठी आनंद आणि धन्यता आहे. प्रभूंच्या कृपेने सर्वांचे मंगल व्हावे, हीच माझी सतत प्रार्थना आहे.
2) मी साधारणपणे प्रत्येक दीड-दोन महिन्यांनी न्यासाच्या कामानिमित्त अयोध्येला येत असतो. आजपर्यंत माझ्या विमानप्रवासाचा किंवा इतर कोणत्याही प्रवासाचा एकही रुपया मी न्यासाकडून खर्च म्हणून घेतलेला नाही. प्रभू श्रीरामांची निःस्वार्थ सेवा करण्यामध्येच मला समाधान आणि धन्यता वाटते.
3) कोषाध्यक्ष या जबाबदारीनुसार न्यासाच्या कोषात जमा झालेल्या निधीचा प्रारंभापासून आजपर्यंतचा हिशोबात उत्पन्न-खर्चाचा संपूर्ण हिशोब सुरक्षित आहे. अधिकृत व्यक्तींकडून त्याची कोणत्याही वेळी तपासणी केली जाऊ शकते.
4) कोषाध्यक्ष म्हणून येणे -देणे याचा हिशोब ठेवणे हे माझे कर्तव्य आहे. मी सतत प्रवासात असल्यामुळे आमच्या पुणे कार्यालयातील चार्टर्ड अकाउंटंट सहकारी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या चार-पाच दिवसांत अयोध्येला येऊन त्यांची तपासणी करतात. तसेच न्यासाच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शनही करतात. त्यांच्या विश्वासार्ह सहकार्यामुळे मी आर्थिक हिशोबाबाबत निश्चित राहू शकतो.
5) न्यासाचा (ट्रस्ट) विश्वस्त झाल्यापासून आजपर्यंत मी स्वतः कोणाकडूनही मंदिरासाठी रोख रक्कम किंवा कोणत्याही स्वरूपातील भेटवस्तू स्वीकारलेली नाही. माझ्या दिवंगत ज्येष्ठ भगिनींनी 11,000 रुपये दिले होते. तसेच श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात 1 किलो वजनाची चांदीची वीट अर्पण केली होती हे दोन अपवाद आहे. या दोघांनाही तत्काळ अधिकृत पावती देण्यात आली होती. याशिवाय मी कोणाकडूनही धनादेशाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपातील देणगी स्वीकारलेली नाही.
6) राम मंदिराच्या वतीने होणारा सर्व खर्च थेट बँकेमार्फत केला जातो. मी अधिकृत स्वाक्षरीकर्ता नसल्यामुळे तेथे माझी सही चालत नाही. आमच्याकडे कोणतेही चेकबुक नाही. कोणतेही व्यवहार रोखीने होत नाहीत. सर्व देणे बँक हस्तांतरणाद्वारेच केली जातात.
7) रामभक्तांनी हुंडीत अर्पण केलेल्या देणग्यांची मोजणी ज्या ठिकाणी केली जाते, त्या प्रक्रियेशी माझा सुरुवातीपासून कधीही संबंध राहिलेला नाही. माझे वास्तव्य पुण्यात आहे. कथाप्रवचनांच्या निमित्ताने माझा सतत प्रवास सुरू असतो. तर देणगी मोजण्याचे काम हे दररोजचे नियमित कार्य आहे. हे काम सुरुवातीपासून स्थानिक विश्वस्तच आहेत. देणगी मोजणीसाठीची कार्यपद्धती (SOP – मानक कार्यपद्धती) त्यांनीच स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने तयार केलीय. ती कार्यपद्धती मला गेल्या महिन्यात प्रथमच दाखविण्यात आलीय.
8) ही दुर्दैवी चोरी किती झाली, कधी झाली आणि कशी झाली, हा तपासाचा विषय आहे. या महापापाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. तपास यंत्रणांवर विश्वास ठेवला पाहिजे. न्यायालय आपले कार्य करेल. विशेष तपास पथक (SIT) आणि पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. दोषी कोणताही असो, तो सुटणार नाही. प्रत्येकाने तपास आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवावा.
9) आम्ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे अनन्य भक्त आहोत. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत आणि मर्यादांचे पालन करतो. आमची ठाम मागणी आहे की पोलिस आणि तपास यंत्रणांनी दोषींना शोधून काढावे. अपराधी कितीही मोठा असो, त्याचे नाव किंवा पद न पाहता त्याला न्यायालयामार्फत कठोर शिक्षा व्हावी.
10) मी न्यासाच्या परम आदरणीय सदस्यांना करबद्ध विनंती करतो की, भविष्यात संपूर्ण सतर्कता आणि दक्षता बाळगून अभेद्य व्यवस्था निर्माण करावी. तज्ज्ञांच्या सल्ल्याने अशी व्यवस्थापन प्रणाली उभी करावी की ज्यामध्ये काटेकोर देखरेख असेल आणि दानपेटीत जमा होणाऱ्या प्रत्येक रुपयाच्या मोजणीत संपूर्ण पारदर्शकता राहील. प्रभू श्रीरामांच्या भक्तांनी कोणत्याही स्वरूपात दिलेल्या देणगीतील प्रत्येक पैशाचा हिशोब निश्चित राहिला पाहिजे.
भविष्यात आमचा प्रयत्न असा असेल की रामलल्लांचे मंदिर संपूर्ण जगासाठी आदर्श मंदिर ठरेल. श्रीरामभक्तीची अखंड धारा सतत वाहत राहो. रामराज्याच्या स्थापनेपर्यंत आपली साधना अखंड सुरू राहिली पाहिजे. सनातन धर्म आणि राममंदिराच्या कीर्तीला कलंक लावण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, हा आमचा अढळ विश्वास असल्याचे गोविंददेव गिरी महाराज यांनी निवेदनात म्हटले आहे.