राम मंदिर देणगी वाद : शिर्डी ते तिरूपती बालाजी मोठ्या मंदिरांमध्ये देणग्यांची मोजणी कशी होते?
Ram Mandir Donation Controversy शिर्डीतील साई बाबा मंदिरात बुलेटप्रूफ सुरक्षा व्यवस्थेत देणग्यांची मोजणी केली जाते.
Ram Mandir Donation Controversy : अयोध्येतील राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांवरून निर्माण झालेल्या वादामुळे देशभरातील मंदिरांमधील देणग्यांच्या व्यवस्थापनावर चर्चा सुरू झाली आहे. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमध्ये कथित अनियमिततेच्या आरोपांनंतर, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष तपास पथक (SIT) सक्रिय करण्यात आली आहे. भक्तांची अफाट श्रद्धा आणि त्यातून मिळणारा करोडो रुपयांचा निधी सुरक्षित ठेवण्यासाठी, भारतातील बड्या मंदिरांनी ‘हाय-टेक’ सुरक्षा आणि अत्यंत पारदर्शक ऑडिट प्रणालीचा अवलंब केला आहे. शिर्डी ते तिरूपती बालाजी मोठ्या मंदिरांमध्ये देणग्यांची मोजणी नेकमी कशी केली जाते त्याबद्दल जाणून घेऊया…
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशचे माजी मंत्री पवन पांडे यांनी 7 जून रोजी दावा केला की, राम मंदिराच्या देणग्यांमधून अंदाजे 7.5 कोटी रुपये चोरीला गेले आहेत. पांडे यांच्याशिवाय समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही देणग्यांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे. पण, नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. देणग्यांचे सध्या लेखापरीक्षण सुरू असून कोणतीही चोरी आढळून आलेली नाही.
देशातील प्रमुख मंदिरांमध्ये देणग्यांची मोजणी कशी केली जाते?
राम मंदिरापासून ते तिरुपती बालाजी, शिर्डीतील साई बाबा मंदीर, सांवालिया सेठ आणि पद्मनाभस्वामी यांच्यापर्यंत देशातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये देणग्यांची मोजणी आणि संरक्षणासाठी वेगवेगळ्या व्यवस्था आहेत. काही ठिकाणी, भाविक स्वतः मोजणीची प्रक्रिया पाहू शकतात, तर इतर ठिकाणी न्यायालयीन देखरेखीखाली देणग्यांची संपूर्ण नोंद ठेवली जाते.
राम मंदिरात देणग्यांची मोजणी कशी केली जाते?
अयोध्येतील राम मंदिरात दान कार्डांमधून काढलेली रोकड, सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू एका विशेष खोलीत गोळा करून मोजल्या जातात. या प्रक्रियेत ट्रस्टचे कर्मचारी आणि बँकेने नियुक्त केलेली एजन्सी यांचा समावेश असतो. देणग्या अधिकृत बँक खात्यांमध्ये जमा केल्या जातात आणि त्यांची खाती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या लेखा विभागामार्फत सांभाळली जातात. परंतु, अलीकडील अनियमिततेच्या आरोपांनंतर ही प्रणाली अधिक कडक करण्यात आली आहे. नोंदी मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखरेख वाढवण्यात आली आहे, मोजणीच्या खोलीत अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि संपूर्ण प्रणालीवर एका माजी लष्करी अधिकाऱ्याची देखरेख आहे.
तिरुपती बालाजीमध्ये काय व्यवस्था आहे?
तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वाधिक दान मिळणाऱ्या मंदिरांपैकी एक मानले जाते. दररोज येथे रोख रक्कम, सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपात कोट्यवधी रुपयांची देणगी मिळते. मंदिर प्रशासन कडक सुरक्षेत दानपेट्या परकमणी भवनात पोहोचवते, जिथे त्यांची मोजणी केली जाते. संपूर्ण परिसर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि एआय-आधारित निगराणी प्रणालीने सुसज्ज आहे. दान स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम लागू असून, कर्मचाऱ्यांना खिसे नसलेले कपडे घालणे बंधनकारक आहे. तसेच मोबाईल फोन किंवा पाकीट बाळगण्यास परवानगी नाहीये. अनेक तपासण्यांनंतरच प्रवेश दिला जातो. विशेष म्हणजे, भाविक काचेच्या भिंतींमधूनही मोजणीची प्रक्रिया पाहू शकतात.
सांवळिया सेठ मंदिरात भक्तदेखील करू शकतात मोजणी
राजस्थानमधील प्रसिद्ध सांवालिया सेठ मंदिरात, देणग्यांची मोजणी एका खुल्या सभागृहात केली जाते. देणगी पेट्या ठराविक वेळी उघडल्या जातात आणि सामान्य भाविक अनेक दिवस चालणाऱ्या या मोजणी प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. या मोजणीवर प्रशासकीय अधिकारी, मंदिर मंडळ आणि बँक अधिकारी देखरेख ठेवतात. सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंची स्वतंत्र नोंद ठेवली जाते. मंदिर प्रशासन नियमितपणे देणग्यांची माहिती जनतेसाठी प्रसिद्ध करते.
शिर्डीतील साई बाबा मंदिरात बुलेटप्रूफ सुरक्षा
महाराष्ट्रातील शिर्डी येथील साई बाबा मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्थेत देणग्यांची मोजणी केली जाते. देणगी पेट्या उघडल्या जातात तेव्हा वरिष्ठ अधिकारी आणि बँकेचे प्रतिनिधी उपस्थित असतात. नोटांची मोजणी बुलेटप्रूफ काचेने संरक्षित असलेल्या एका खोलीत होते. कर्मचाऱ्यांना खिसे नसलेले कपडे घालणे आणि आत प्रवेश करण्यापूर्वी मेटल डिटेक्टर तपासणी करणे बंधनकारक आहे. मंदिराच्या हिशोबाचे लेखापरीक्षण एका सरकारी संस्थेद्वारे केले जाते.
पद्मनाभस्वामी मंदिरात न्यायालयीन देखरेख
केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिरात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या एका समितीमार्फत देणगी व्यवस्थापन हाताळले जाते. देणगी पेट्या सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली उघडल्या जातात आणि या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान बँकेचे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी व समिती सदस्य उपस्थित असतात. अशाच प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी वेळोवेळी लेखापरीक्षणही केले जाते.