खुशखबर! दरवर्षी PUC काढण्याची गरज संपणार?; केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

PUC Certificate केंद्राने PUC प्रमाणपत्राच्या नियमांमध्ये मोठा बदल सुचवला असून दरवर्षी PUC काढण्याच्या त्रासातून आता सुटका होण्याची शक्यता

  • Written By: Published:
PUC Certificate

Govt May Extends PUC Certificate Validity For BS VI Vehicles : केंद्र सरकार BS-VI मानकांनुसार तयार झालेल्या खासगी वाहनांसाठी ‘पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट’ (PUC/PUCC) संदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे देशातील लाखो खासगी वाहनधारकांची दरवर्षी PUC काढण्याची गरज संपुष्टात येणार आहे.

नेमका प्रस्ताव काय?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) तयार केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार, सहा वर्षांपर्यंत जुन्या BS-VI खासगी वाहनांच्या PUC प्रमाणपत्राची वैधता सध्याच्या एका वर्षावरून थेट तीन वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास दरवर्षी PUC काढण्यासाठी वाहनधारकांना होणारी धावपळ आणि खर्च दोन्ही कमी होणार आहेत.

या मसुदा अधिसूचनेनुसार, सहा वर्षांपर्यंत जुन्या BS-VI खासगी वाहनांना तीन वर्षांनी एकदाच PUC नूतनीकरण करावे लागेल. मात्र वाहनाचे वय वाढल्यानंतर तपासणीची वारंवारता वाढणार आहे. सहा ते दहा वर्षे जुन्या BS-VI वाहनांना दरवर्षी PUC नूतनीकरण करावे लागेल, तर दहा वर्षांपेक्षा अधिक जुनी BS-VI वाहने दर सहा महिन्यांनी PUC तपासणीसाठी पात्र असतील.

कुठल्या वाहनांना कधी लागणार PUC

याशिवाय इतर उत्सर्जन मानकांनुसार असलेल्या वाहनांसाठी सध्याचे नियम कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. BS-IV मानकांनुसार असलेल्या सर्व वाहनांना दर सहा महिन्यांनी PUC नूतनीकरण करावे लागेल, तर BS-I, BS-II आणि BS-III मानकांनुसार असलेल्या वाहनांसाठी दर तीन महिन्यांनी PUC नूतनीकरण अनिवार्य राहणार आहे. BS उत्सर्जन मानके ही वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आली आहेत. या मानकांद्वारे कार्बन मोनॉक्साइड (CO), नायट्रोजन ऑक्साइड (NOx), हायड्रोकार्बन्स (HC) आणि पार्टिक्युलेट मॅटर (PM) यांसारख्या हानिकारक प्रदूषकांच्या उत्सर्जनावर मर्यादा घालण्यात येतात.

BS-VI कमी प्रदूषण करतात

भारतात 2017 ते 2020 या काळात BS-IV मानके लागू होती, तर एप्रिल 2020 पासून BS-VI मानकांची अंमलबजावणी सुरू झाली. विशेष म्हणजे, प्रदूषण नियंत्रणाला गती देण्यासाठी भारताने BS-V हा टप्पा वगळून थेट BS-VI मानके लागू केली. BS-VI तंत्रज्ञानावर आधारित वाहने जुन्या वाहनांच्या तुलनेत लक्षणीय कमी प्रदूषण करतात. त्यामुळे अशा वाहनांना वारंवार PUC तपासणीची आवश्यकता नसल्याचे सरकारचे मत असून, त्याच पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वाहनधारकांवरील प्रशासकीय भार कमी होण्याबरोबरच आधुनिक आणि कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कधी होणार अंतिम निर्णय

सध्या हा केवळ मसुदा अधिसूचना आहे. संबंधित भागधारकांकडून सूचना आणि हरकती मागवल्यानंतर अंतिम अधिसूचना जारी केली जाईल. त्यामुळे हे नियम अद्याप लागू झालेले नसून, अंतिम मंजुरीनंतरच त्यांची अंमलबजावणी होणार आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर देशातील लाखो BS-VI वाहनधारकांना दरवर्षी PUC काढण्याच्या प्रक्रियेतून मोठा दिलासा मिळणार आहे.

follow us