Govt on Adani : अदानी प्रकरणावर सरकारने हात झटकले
नवी दिल्ली : अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या (Hindenburg Research) अदानी समूहावरील आरोपानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाशी सरकारचा काहीही संबंध नाही, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी शुक्रवारी सांगितले.
संसदेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, “विरोधक हा मुद्दा उपस्थित करत आहेत कारण त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नाही. हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्सची जोरदार विक्री होत आहे आणि त्याचे शेअर्स घसरत आहेत. यात सरकारचा काही सबंध नाही.”
Hindenburg Research हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे गौतम अदानींच्या (Gautam Adani) साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. तो धक्का अजूनही सावरला जात नाही, प्रत्येक दिवस त्याच्या संपत्तीत मोठी घसरण आणत आहे. ताज्या माहितीनुसार गौतम अदानी जगातील सर्वाधिक 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.
२४ तासात १६व्या क्रमांकावरून २१ व्या स्थानी
गौतम अदानी गुरुवारी 64.7 अब्ज डॉलर्ससह जगातील श्रीमंतांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर होते आणि अवघ्या 24 तासांत ते आणखी पाच स्थानांनी घसरून 21 व्या क्रमांकावर आले आहेत. 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा व्यक्ती म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या अदानी यांच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत वाईट ठरत आहे.