GST Collection : जीएसटीतील केंद्राची कमाई घटली, महाराष्ट्राचं काय?

  • Written By: Published:
GST Collection : जीएसटीतील केंद्राची कमाई घटली, महाराष्ट्राचं काय?

जीएसटी आता तुम्हा-आम्हासाठी नवीन नाही. सध्या केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत असलेल्या जीएसटीमधून केंद्र सरकाचे फेब्रुवारी महिन्यातील उत्पन्न थोडे घटले आहे. पण याच वेळी महाराष्ट्र मात्र जीएसटी संकलनात क्रमांक एकवर आहे. एवढच नाही तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या कर्नाटक पेक्षा महाराष्ट्र दुप्पट जीएसटी संकलन करतो आहे.

केंद्राला आठ हजार कोटीचा फटका

जीएसटी कलेक्शनमध्ये 8 हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची कमाई कमी झाली आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत वस्तू आणि सेवा कराचे उत्पन्न घटले आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यावर्षी जीएसटी कलेक्शनमध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात 1.49 लाख कोटी रुपयांहून जीएसटी कलेक्शन जास्त झाले आहे. हा सलग 12 वा महिना आहे. जेव्हा जीएसटी कलेक्शन 1.40 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

फेब्रुवारी 2023 मध्ये जीएसटी (GST) पोटी जमा झालेला एकत्रित महसूल ₹1,49,577 कोटी इतका आहे. त्यापैकी सीजीएसटी (CGST) ₹27,662 कोटी, एसजीएसटी (SGST) ₹34,915 कोटी, आयजीएसटी (IGST) ₹75,069 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा झालेल्या ₹35,689 कोटींसह) आणि उपकर ₹11,931 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा झालेल्या ₹792 कोटींसह) आहे.

सरकारने आयजीएसटी मधून नियमित थकबाकीपोटी ₹34,770 कोटी सीजीएसटी आणि ₹29,054 कोटी एसजीएसटी ची थकबाकी दिली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये नियमित थकबाकी नंतर केंद्र आणि राज्यांकडून जमा झालेला एकूण महसूल, CGST साठी ₹62,432 कोटी आणि SGST साठी ₹63,969 कोटी इतका आहे. याव्यतिरिक्त, केंद्राने शिल्लक GST भरपाई पोटी, जून 2022 या महिन्यासाठी ₹16,982 कोटी, तर आधीच्या कालावधीसाठीची AG प्रमाणित आकडेवारी पाठवणारी राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांना ₹16,524 कोटी रक्कम जारी केली होती.

फेब्रुवारी 2023 मध्ये जीएसटी पोटी गोळा झालेला महसूल, मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 12% जास्त आहे, जो रु. 1,33,026 कोटी इतका होता. या महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वस्तूंच्या आयाती द्वारे जमा झालेला महसूल 6% जास्त आहे आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) 15% जास्त आहे.

पण या सगळ्यावर केंद्र सरकारकडून एक नवा तर्क दिला आहे. फेब्रुवारी हा 28 दिवसांचा महिना असल्याने, तुलनेने कमी महसूल जमा होतो. असा तर्क केंद्राकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्राची परिस्थिती काय?

महाराष्ट्रातून फेब्रुवारी 2023 मध्ये 22,349 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये 19,423 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्के वाढ झाली आहे. याहीमध्ये महाराष्ट्र जीएसटी संकलनात पहिल्या क्रमांकावर आहे.

पण याचवेळी दुसऱ्या स्थानावर कर्नाटक राज्यातून 10 हजार 809 कोटी रुपयांचा जीएसटी कर जमा करण्यात आला. तिसऱ्या स्थानावर गुजरात राज्य आहे. गुजरातने मागील महिन्यात 9 हजार 574 कोटींचा कर जमा केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube