India Partition : ‘देशाची फाळणी ही ऐतिहासिक चूक’; ओवैसींनी स्पष्टच सांगितलं
India Partition : समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी देशाच्या फाळणीबाबत (India Partition) केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असतानाच एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचे वक्तव्यही चर्चेत आले आहे. भारताची फाळणी व्हायला नको होती. मात्र, दुर्भाग्याने ते घडलं आणि देशाची फाळणी झाली, असे ओवैसी हैदराबादमध्ये म्हणाले.
समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू महासभेमुळे देशाची फाळणी झाली, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता ओवैसींनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, देशाची फाळणी होणं ही एक ऐतिहासिक चूक होती. देशाची फाळणीच व्हायला नको होती. दु्र्दैवाने हा निर्णय घेतला गेला आणि देशाचं विभाजन झालं. देशाची फाळणी कशी झाली याचं उत्तर मी सविस्तर देऊ शकतो. मात्र ही एक ऐतिहासिक चूक एवढं मी एका ओळीत सांगू शकत नाही. यावर जर डिबेट ठेवले तर देशाच्या विभाजनाला खरे जबाबदार कोण आहेत हे मी सांगू शकतो. तुम्ही इंडिया विन्स फ्रिडन हे मौलाना आझाद यांचं पुस्तक वाचलं पाहिजे, असे ओवैसी म्हणाले.
कर्नाटकमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती; एचडी देवेगौडांच्या जेडीएसवर प्रदेशाध्यक्षांनी ठोकला दावा
या देशाचे विभाजन व्हायला नको होते. विभाजन चुकीचेच होते. जर तुम्ही मौलान आझाद यांचं पुस्तक वाचलं तर मौलाना आझाद यांनी सर्व काँग्रेस नेत्यांना देशाचे विभाजन करू नका, अशी मागणी केली होती, असेही ओवैसी म्हणाले. दरम्यान, तेलंगणा विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असतानाच ओवैसी यांचं हे वक्तव्य आलं आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची तेलंगणाच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यात 30 नोव्हेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत ओवैसी भाजपबरोबरच काँग्रेस विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत.
स्वामी प्रसाद मौर्य काय म्हणाले होते ?
याआधी समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी देशाच्या फाळणीवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. जर कुणीही हिंदू राष्ट्र व्हावं अशी मागणी करत असेल तर दुसरे लोकही तशी मागणी करणार नाहीत का. जे हिंदू राष्ट्राची मागणी करत आहेत ते देशाचे शत्रू आहेत. याआधी हिंदू महासभेने हिंदू राष्ट्राची मागणी केली होती. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाली.