Indian Army: महाराष्ट्रातील अग्निवीर अक्षय गवते सियाचीनमध्ये शहीद

  • Written By: Published:
Agni Veer Martyr

Indian Army: भारतीय लष्कराचे अग्निवीर सैनिक अक्षय लक्ष्मण गवते हे लडाखमधील सियाचीनमध्ये शहीद झाले आहेत. कर्तव्य बजावताना शहीद होणारे ते पहिले अग्निवीर सैनिक आहेत. अक्षय हे भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सचा भाग होते.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराईचे रहिवासी अक्षय गवते (23) यांच्या हौतात्म्याबद्दल भारतीय लष्कारने माहिती दिली आहे. फायर अँड फ्युरी कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून अक्षय यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनेही ट्विट करून ही माहिती दिली आहे. जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये त्यांना तैनात करण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे. बलिदान दिलेल्या जवानाचे पार्थिव रविवारी (22 ऑक्टोबर) त्यांच्या घरी पाठवले जाणार असल्याचे लष्कराने सांगितले.

अक्षय लक्ष्मण गवते हे मूळचे महाराष्ट्रातील रहिवासी असल्याची माहिती लष्कराकडून मिळाली आहे. लेह येथे मुख्यालय असलेल्या भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्समध्ये त्यांची पहिली पोस्टिंग झाली. भारतीय लष्कराने लिहिले की, सियाचीनच्या सर्वोच्च शिखरावर त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. या दुःखाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

सियाचीन ग्लेशियर भारत-पाकिस्तान सीमेवर स्थित आहे, ज्याला जगातील सर्वात उंच युद्ध शिखर म्हटले जाते. येथील तापमान शून्याच्या खाली असल्याने ड्युटी करणे सोपे नाही. जून 2022 मध्ये भारतीय सैन्यात अग्निवीरची नियुक्ती सुरू झाली.

Tags

follow us