रेल्वेचा मोठा बदल! सामानासाठी आता ऑनलाइन बुकिंग; किती सामान नेता येणार?

Railways Luggage Rules रेल्वेच्या नियमानुसार 100 x 60 x 25 सेमी या कमाल आकारापर्यंतचे ट्रंक, सूटकेस किंवा बॉक्स प्रवासी डब्यात नेता येतात.

  • Written By: Published:
Indian Railways Online Personal Luggage Booking New Rules

Indian Railways Online Personal Luggage Booking New Rules : रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 31 जुलै 2026 पासून कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना वैयक्तिक सामानाची (Personal Luggage) ऑनलाइन बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे अतिरिक्त सामानाची नोंदणी करण्यासाठी स्टेशनवर जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नाही. प्रवासी प्रवासापूर्वीच घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने सामानाची बुकिंग करू शकतील. रेल्वे बोर्डाने 20 जुलै 2026 रोजी सर्व विभागीय रेल्वेंना यासंदर्भात निर्देश दिले होते. ही सुविधा केवळ कन्फर्म आरक्षण असलेल्या प्रवाशांसाठी लागू असून, वेटिंग लिस्ट किंवा RAC तिकीटधारकांना सध्या याचा लाभ मिळणार नाही.

काय बदललं?

यापूर्वी अतिरिक्त सामानाची बुकिंग करण्यासाठी स्टेशनवर जाऊन स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. आता ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करता येणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार असून लगेज बुकिंग अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. ऑनलाइन बुकिंगदरम्यान प्रवाशांना त्यांच्या तिकीटाच्या वर्गानुसार मोफत सामानाची मर्यादा, जास्तीत जास्त किती वजन नेता येईल, कोणत्या वस्तूंना परवानगी नाही आणि अतिरिक्त सामानासाठी किती शुल्क आकारले जाईल, याची माहितीही दिली जाणार आहे.

कोणाला मिळणार लाभ?

– कन्फर्म आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच सुविधा
– वेटिंग लिस्ट आणि RAC तिकीटधारकांना सध्या लागू नाही
– प्रवासी स्वतःसोबत आरक्षित डब्यात नेणाऱ्या वैयक्तिक सामानासाठीच ही सुविधा

मोफत किती सामान नेता येईल?

– फर्स्ट एसी (1AC) – 70 किलो
– फर्स्ट क्लास / सेकंड एसी (2AC) – 50 किलो
– थर्ड एसी (3AC), 3E, एसी चेअर कार (CC) आणि स्लीपर – 40 किलो
– सेकंड क्लास – 35 किलो

अतिरिक्त सामान असल्यास काय?

मोफत मर्यादेपेक्षा अधिक सामान असल्यास त्याचीही ऑनलाइन बुकिंग करता येईल. मात्र, त्यासाठी लागू असलेल्या लगेज दराच्या 1.5 पट शुल्क भरावे लागेल. शुल्क भरल्यानंतर अतिरिक्त सामान प्रवासी आरक्षित डब्यातच सोबत घेऊन जाऊ शकतील.

सामानाच्या आकाराबाबतही नियम

रेल्वेच्या नियमानुसार 100 x 60 x 25 सेमी या कमाल आकारापर्यंतचे ट्रंक, सूटकेस किंवा बॉक्स प्रवासी डब्यात नेता येतात. यापेक्षा मोठ्या आकाराचे सामान ब्रेक-व्हॅनमध्ये स्वतंत्रपणे बुक करावे लागेल. तसेच, व्यावसायिक माल वैयक्तिक सामान म्हणून प्रवासी डब्यात नेण्यास परवानगी नाही.

प्रवाशांना काय फायदा?

या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना स्टेशनवरील लगेज बुकिंगची धावपळ टळणार आहे. प्रवासापूर्वीच ऑनलाइन सामानाची नोंदणी करता येणार असल्याने वेळ वाचेल, प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि प्रवास अधिक नियोजनबद्ध करता येईल. त्यामुळे रेल्वेने प्रवासाचा बेत आखत असाल, तर सामानाचे वजन आणि आकार आधी तपासून आवश्यक असल्यास ऑनलाइन लगेज बुकिंगचा लाभ अवश्य घ्या.

 

follow us