इस्रोच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 चे यशस्वी प्रक्षेपण; काय आहे ‘ब्लूबर्ड ब्लॉक-२’चं महत्व?
ब्लूबर्ड ब्लॉक-२ मिशन हे ग्लोबल LEO कॉन्स्टेलेशनचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश सॅटेलाइटद्वारे थेट मोबाइल फोनवर कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्थाने नुकतेच एका ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण केलं आहे. (Launch) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी ८.५४ वाजता ‘LVM3-M6’ या भारताच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटद्वारे अमेरिकेचा ‘ब्लूबर्ड ब्लॉक-२’ हा उपग्रह अवकाशात सोडला गेला आहे. हा उपग्रह केवळ एक यंत्र नसून मोबाईल तंत्रज्ञानातील मोठी क्रांती आहे. कारण ब्लूबर्ड ब्लॉक-२ हा जगातील सर्वात मोठा व्यावसायिक दळणवळण उपग्रह आहे.
ब्लूबर्ड ब्लॉक-२ मिशन हे ग्लोबल LEO कॉन्स्टेलेशनचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश सॅटेलाइटद्वारे थेट मोबाइल फोनवर कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आहे. यामुळे 4G आणि 5G व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल, मेसेजिंग आणि डेटा सेवा जगाच्या कोणत्याही भागात उपलब्ध करून दिल्या जातील. कोणत्याही स्मार्टफोनद्वारे अंतराळातून थेट कॉल करता येईल. मात्र, सध्या विमानात बसून कॉल करता येत नाही, कारण याचा नेव्हिगेशन सिस्टमवर परिणाम होतो. इस्रोच्या मते, हे मिशन एक समर्पित व्यावसायिक प्रक्षेपण आहे, जे न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि अमेरिकेच्या स्पेसमोबाइल कंपनीद्वारे करण्यात आले आहे.
रॉकेट आकाशात झेपावलं
24 तासांच्या उलटी गणतीनंतर 43.5 मीटर उंच आणि दोन एस200 सॉलिड बूस्टरनं सुसज्ज असलेले हे रॉकेट आकाशात झेपावलं. अंदाजे 15 मिनिटांच्या प्रवासानंतर ब्लूबर्ड ब्लॉक-2 उपग्रह रॉकेटपासून वेगळा होऊन सुमारे 520 किलोमीटर उंचीच्या कमी पृथ्वी कक्षेत (एलईओ) पोहोचला.
सुमारे 6,100 किलो वजन
कमी पृथ्वी कक्षेतील विक्रम मोडणारी मोहीम ब्लूबर्ड ब्लॉक-2 हा उपग्रह एलव्हीएम3 रॉकेटच्या इतिहासातील कमी पृथ्वी कक्षेत प्रक्षेपित केलेला सर्वांत जड पेलोड आहे. सुमारे 6,100 किलो वजनाचा आणि 223 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या फेज्ड अॅरे अँटेनानं युक्त असलेला हा उपग्रह कमी पृथ्वी कक्षेतील सर्वांत मोठा व्यावसायिक दूरसंचार उपग्रह ठरला आहे. एलव्हीएम3 रॉकेटनं यापूर्वी चंद्रयान-2, चंद्रयान-3 आणि दोन वनवेब मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नोव्हेंबर 2025 मधील एलव्हीएम3-एम5/सीएमएस-03 मोहीमेनंतर ही मोहीम इस्रोची आणखी एक यशोगाथा ठरली.
