इंडिया आघाडी विरूद्ध आजी-माजी पंतप्रधान एकत्र, लोकसभा निडणुकांसाठी जेडीएस-भाजप युतीची घोषणा
बेंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आता आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात एकटवले आहेत. अशातच भाजपनेही इंडिया आघाडीच्या (INDIA) विरोधात जोरदार कंबर कसली. जनता दल (सेक्युलर ) अर्थात जेडीएसचे नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (HD Deve Gowda) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जेडीएस आणि भाजपच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आम्ही कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही, अशी देवेगौडा यांची भूमिका होती. मात्र, अखेर देवेगौडा यांनी भाजप आणि जेडीएस एकत्र निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांनीही या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.
काल बेंगळुरूमध्ये जेडीएसच्या कार्यक्रमाला संबोधित करताना एचडी देवेगौडा म्हणाले की, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एचडी कुमारस्वामी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपसात चर्चा करून प्रत्येक पक्षाला किती जागा मिळतील याचा फॉर्म्युला ठरवतील, असेही ते म्हणाले.
देवेगौडा यांनी आपल्या प्रादेशिक पक्षाचे अस्तित्व वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवरही टीका केली. ते म्हणाले की,आपण इतके मोठे धर्मनिरपेक्ष नेते असूनही काँग्रेस आणि इंडियाच्या इतर नेत्यांनी या आघाडीचा भाग होण्यासाठी त्यांच्याशी साधा संपर्क साधला नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष राजकीय समीकरणे आखण्यात व्यस्त आहेत. एकीकडे इंडिया आघाडीची पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी आहे, तर दुसरीकडे कर्नाटकातील पराभवानंतर भाजपही राज्याकडे गांभीर्याने पहात नाही, त्यामुळं भाजप आणि जेडीएस कर्नाटकता युती करून नव्या युध्दासाठी तयार झाल्याचे दिसते.
कॉंग्रेसची टीका
दरम्यान, जेडीएस आणि भाजपच्या या युतीवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. जेडीएस हा भाजपची बी टीम असल्याचे मी म्हणायचे आणि आता ते सिद्ध झाले आहे. जेडीएस पक्ष धर्मनिरपेक्ष विचारधारा असल्याचा दावा करतो, मात्र, त्यांनी जातीवादी पक्षाशी युती केल्याची टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.