Karnataka Cabinet Expansion : काँग्रेसचा मोठा निर्णय, आज ‘इतक्या’ मंत्र्यांना देणार शपथ
Karnataka Cabinet Expansion : कर्नाटकात मंत्रिमंडळाची विस्ताराची (Karnataka Cabinet Expansion) तयारी पूर्ण झाली असून आज दुपारी आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याची यादीही काँग्रेस (Congress) पक्षाने जारी केली आहे. आज दुपारी शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात एकूण 24 मंत्री शपथ घेतील असे सांगण्यात येत आहे. याआधी 20 मे रोजी आठ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर सहाच दिवसात आणखी 24 मंत्र्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी नावांची यादी राज्यपालांकडे पाठविली होती. त्यांनी सांगितले की मंत्रिपदासाठी नावांची निवड करताना काँग्रेसने सामाजिक न्यायाच्या तत्वांचा विचार करून सर्व जाती आणि क्षेत्रांना समान प्रतिनिधीत्व देण्याच्या निकषांचे पालन केले आहे.
मंत्र्यांच्या यादीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी पदाधिकारी एन. बोसेरोजू यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बोसेराजू हे विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. मात्र, काँग्रेस आणि त्यांच्या वरिष्ठ नेतेमंडळींशी त्यांचा चांगला संपर्क आहे.
आज मंत्रिमंडळात 24 मंत्र्यांचा समावेश केला गेल्यानंतर 34 मंत्र्यांच्या मर्यादेपर्यंत मंत्रिमंडळ पोहोचेल. या यादीत 12 आमदार असे आहेत ज्यांना मंत्रिपदाचा कोणताही अनुभव नाही. यामध्ये के. व्यंकटेश, के. एन. राजन्ना, एस. एस. मल्लिकार्जुन, मंकल वैद्य, लक्ष्मी हेब्बलकर, रहीम खान, एन. एस. बोसेराजू, बैराथी सुरेश, मधु बंगारप्पा, डॉ. एम. सी. सुधाकर, आर. बी. थिम्मापूर आणि बी. नागेंद्र यांचा समावेश आहे.
आदित्य ठाकरेंसह १५ जणांची आमदारकी धोक्यात? ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदेची खेळी
यानंतर रविवारी या मंत्र्यांना खातेवाटप करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्याता आहे. याआधी मुख्यमंत्री यांच्या शपथविधी कार्यक्रमात सिद्धरामय्या यांच्यासह आणखी 8 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी या मंत्र्यांना शपथ दिली होती. या मंत्रिमंडळात जातीय समीकरणावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येक जाती धर्माला प्रतिनिधीत्व याची काळजी काँग्रेसने घेतल्याचे दिसून येत आहे.