Karnataka Election 2023 : धर्मावर आधारित आरक्षण घटनाबाह्य; अमित शाहांचा कॉंग्रेसवर घणाघात
Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. 10 मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी राज्यातील विविध पक्षांचे नेते एकामागून एक जाहीर सभा घेत आहेत. नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असतानाच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah)यांनी सोमवारी कर्नाटकमध्ये धर्माच्या आधारे आरक्षणाला असंवैधानिक ठरवत, कॉंग्रेसवर (Congress)जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, धर्माच्या आधारे आरक्षण हे घटनाबाह्य आहे. निवडणुकीनंतर भाजप कर्नाटकात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai)यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्वीकारलेला कोटा फॉर्म्युला लागू करेल.
सरकार आल्यास ‘जीएसटी’च हटवणार; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा
काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत गृहमंत्री शाहा म्हणाले की, काँग्रेस नेते पुन्हा एकदा मुस्लिम आरक्षण (Muslim reservation)आणणार असल्याचे सांगत आहेत. मी त्यांना नम्रतेने विचारू इच्छितो, ते परत आणण्यासाठी तुम्ही कोणाचं आरक्षण कमी कराल? वोक्कलिगाचं कमी करणार की लिंगायत समाजाचं की दलित की एसटी समाजाचं आरक्षण कमी करणार? यावर काँग्रेसला स्पष्टपणे बाहेर पडावे लागेल.
गृहमंत्री अमित शाहा म्हणाले की, भाजपने काँग्रेस सरकारने मुस्लिम समाजाला दिलेले चार टक्के आरक्षण रद्द केले आणि लिंगायत, वोक्कलिगा, एससी/एसटी आरक्षण वाढवले. ते म्हणाले की, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे की, त्यांचा पक्ष सत्तेत आल्यानंतर पुन्हा मुस्लिमांना चार टक्के आरक्षण बहाल करेल. त्यांनी जनतेला विचारले की, त्यांना मुस्लिमांसाठी आरक्षण हवे आहे का?
ते म्हणाले की, जे मुस्लिम समाज ओबीसी अंतर्गत येतात, त्यांना आम्ही आजही आरक्षण द्यायला तयार आहोत आणि देत आहोत, मात्र धर्माच्या आधारावर कोणालाही आरक्षण देऊ नये. यापूर्वी, सरकारने अनुसूचित जातींसाठी 15 टक्क्यांवरून 17 टक्के आणि अनुसूचित जमातीसाठी 3 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे कर्नाटकातील एकूण आरक्षण 56 टक्क्यांवर नेले आहे.
ते म्हणाले की, ही निवडणूक पूर्णपणे मोदींच्या विकासाच्या राजकारणाविरुद्ध काँग्रेसचे तुष्टीकरणाचे राजकारण आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा डबल इंजिनचे सरकार स्थापन होईल, असेही ते म्हणाले. मोदी आणि आमचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी कर्नाटकच्या प्रगतीसाठी काम केले आणि यापुढेही करत राहतील. त्यांनी जनतेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.