डोक्यावर संकट घोंगावत असताना कोल्हापूरकर दुबईतून सुखरूप घरी परतले

काही पर्यटकांनी स्फोटांचे आवाज ऐकल्याचे किंवा ड्रोन हल्ल्यांच्या बातम्यांमुळे घाबरल्याचे सांगितले.

Kolhapurr

अमेरिका, इस्त्राईल, इराण युद्धछायेत अडकलेले भारतीय (Iran) देशात परतू लागले आहेत. दुबई येथे गेलेला कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटकांचा चमूही करवीर नगरीत दाखल झाला आहे. चांदी नगरी हुपरी येथील २५ जणांच्या प्रवाशांचे एक पथक गावी पोहोचल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. दुबई सरकारने झालेल्या त्रासाबद्दल २६ हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर देऊ केल्याने या पर्यटकांच्या आनंदात आणखी भर पडली आहे.

मध्यपूर्वेतील (इराण-इस्त्रायल) संघर्ष आणि ड्रोन हल्ल्यांच्या घटनांमुळे दुबईत अडकलेल्या भारतीय प्रवाशांनी थरारक आणि अनिश्चिततेचे अनुभव देशात आल्यावर सांगितले आहेत. उड्डाणे रद्द झाल्याने अनेकजण विमानतळावर अडकले होते. अनेक प्रवासी दुबई, अबू धाबी आणि दोहा विमानतळांवर अडकले होते.

अमेरिका इराण युद्ध पेटलेलं, मराठवाड्यातील अनेक नागरिक आखाती देशात अडकले

हजारो उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. तर काही पर्यटकांनी भीतीपोटी दुबई सोडणे पसंत केले. सध्या दुबईत परिस्थिती पूर्वपदावर येत असली, तरी प्रवाशांमध्ये अद्याप धाकधूक कायम आहे. हुपरी येथील स्त्री-पुरुषांचे एक पथक दुबई येथे सहलीसाठी गेले होते. त्यांनी अबुधाबीचाही दौरा केला होता. आज सर्वजण हे कोल्हापुरात दाखल झाले. नातेवाईकांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. या प्रवाशांनी दुबई मधील आपला थरारक अनुभव कथन केला.

यातील एका प्रवाशांनी सांगितले की, सकाळी उठण्यापूर्वीच मोबाईलवर दुबई सरकारकडून मेसेज यायचा तुम्ही सुरक्षित आहात परंतु हॉटेलच्या बाहेर जाऊ नका. सर्व सुविधा तुम्हाला पुरवल्या जातील. काळजी घ्या, निश्चित रहा. एके दिवशी जेवण करून हॉटेल बाहेर जायचा विचार करत होतो तोच अर्धा किलोमीटर अंतरावर धुराचे लोट येताना दिसले . त्यामुळे मनात भीती निर्माण झाली. अशी युद्ध स्थिती प्रथमच अनुभवता आली.

काही पर्यटकांनी स्फोटांचे आवाज ऐकल्याचे किंवा ड्रोन हल्ल्यांच्या बातम्यांमुळे घाबरल्याचे सांगितले. बुरुज खलिफा परिसरातील पर्यटकांनी भीतीचे वातावरण अनुभवले. विमाने बंद झाल्याने परतीचे काय होणार याची चिंता निर्माण झाली होती बॉम्बस्फोटामुळे भीतीमध्ये भर पडत चालली होती. अखेर अनेक संकटांवर , अडचणीच्या परिस्थितीवर मात करून घरी पोचल्याचा आनंद या पर्यटकांनी व्यक्त केला. दुबई सरकारने परिस्थिती संयमाने हाताळली असंही ते म्हणाले.

 

follow us