पोलिस अधिकारी प्रेयसीसोबत नको ‘त्या’ अवस्थेत, ग्रामस्थांनी पकडताच अधिकाऱ्याचा गोळीबार, एकाचा मृत्यू!
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात एका ग्रामस्थाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.
Bihar Balirajgarth News : एका पोलिस अधिकाऱ्याला आपल्या प्रेयसीसोबत नको त्या अवस्थेत ग्रामस्थांनी पकडल्यानंतर ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यामध्ये झालेल्या वादात अधिकाऱ्याने सलग चार वेळा गोळीबार केल्याची घटना बिहारमध्ये (Balirajgarth) घडलीयं. या गोळीबारात एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला असून इतर तीन ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर मधुबनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या अधिकाऱ्याचा तपास सुरु आहे. या घटनेने एकच खळबळ उडालीयं.
नेमकं काय घडलं?
बाबुबरही पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बलिराजगड परिसरात तैनात होते. नजीकच्या गावात म्हणजेच बलिराजगड गावात त्यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. सोमवारी दि. 2 नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महिलेच्या घरी गेले होता. यावेळी ग्रामस्थांनी संबंधित सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला नको त्या अवस्थेत पाहिल्याचा ग्रामस्थांकडून दावा केला जात आहे.
यावेळी संबंधित पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार वाद सुरु झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संबंधित पोलिस अधिकाऱ्याने आपल्याजवळील सर्व्हिस पिस्तुलमधून सलग चार गोळ्या झाडल्या. या चार गोळ्यांमधील एक गोळी
एका ग्रामस्थाला लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अशोक यादव असं या गोळीबारात मृत्यू झालेल्या ग्रामस्थाचे नाव आहे.
या घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारादरम्यान अशोक यादव यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आलीय. या घटनेनंतर मधुबनीचे जिल्हा पोलिस अधीक्षक योगेंद्र कुमार यांनी बलिराजगड गावात घटनास्थळी भेट दिली असून परिस्थितीची पाहणी केलीयं. तर संबंधित सहाय्यक उपनिरीक्षकाला निलंबित करण्याची प्रक्रिया सुरु असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती समोर आलीयं.
या घटनेनंतर संबंधित सहाय्यक उपनिरीक्षक फरार झाला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांकडून दोन पथके तयार करण्यात आलीयं. या पथकांकडून संभाव्य ठिकाणी छापेमारी केली आहे. या अधिकाऱ्याला लवकरच अटक केली जाईल, असं पोलिस अधीक्षकांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांकडूनच गोळीबार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.