ब्रिटिश हिंदूंची निष्ठा ते हिंदू राष्ट्राची संकल्पना; ब्रिटनमधील कार्यक्रमात मोहन भागवतांनी मांडली स्पष्ट भूमिका

भागवत यांनी ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटनप्रती असलेली निष्ठा, नव्या पिढीची भूमिका तसेच ‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेवर आपले विचार मांडले.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 07T121708.811

Mohan Bhagwat stated a clear position : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ब्रिटनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ब्रिटिश हिंदूंशी संवाद साधताना महत्त्वाचं भाष्य केलं आहे. ‘सेलिब्रेशन ऑफ वननेस’ या कार्यक्रमाला मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली होती. हिंदू स्वयंसेवक संघ UK आणि इंटीग्रल या संस्थेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी भागवत यांनी ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटनप्रती असलेली निष्ठा, नव्या पिढीची भूमिका तसेच ‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेवर आपले विचार मांडले.

ब्रिटिश हिंदूंनी ब्रिटनप्रती कायम निष्ठा दाखवली असून त्यांची ही भूमिका योग्य असल्याचं मोहन भागवत यांनी म्हटलं. भारत ही त्यांची जन्मभूमी असली तरी ब्रिटन ही त्यांची कर्मभूमी आहे आणि कर्मभूमीशी निष्ठा राखणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जन्मभूमी आपल्याला संस्कार देते, तर कर्मभूमी आपल्याला निष्ठा कशी राखायची हे शिकवते, असं भागवत म्हणाले. ज्या भूमीत आपण काम करतो आणि आपलं जीवन घडवतो, त्या कर्मभूमीशी कुणीही गद्दारी करता कामा नये. त्यामुळे ब्रिटिश हिंदूंची ब्रिटनशी असलेली निष्ठा आपल्याला पटते आणि ती अत्यंत सुसंगत भूमिका असल्याचं मोहन भागवत यांनी सांगितलं.

या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी जेन झी आणि जेन अल्फा या नव्या पिढ्यांबाबतही आपली भूमिका मांडली. नव्या पिढीवर आपला पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं. जेन झी असो किंवा जेन अल्फा, येणाऱ्या पिढ्यांमध्ये चांगला विचार करण्याची क्षमता असल्याचं भागवत म्हणाले. जग अधिक चांगलं घडलं पाहिजे, असा विचार या पिढ्यांमध्ये असून त्यासाठी छोटे-मोठे मतभेद बाजूला ठेवण्याची त्यांची तयारी असल्याचं त्यांनी नमूद केलं. नव्या पिढीतील तरुण आपल्या विचारांशी प्रामाणिक आहेत आणि आगामी काळात देश तसेच जग घडवण्यात तरुणाईचा मोठा वाटा असेल, यात कोणतीही शंका नसल्याचं मोहन भागवत यांनी म्हटलं.

तुकाराम मुंढेंना प्रिती झिंटाचा पाठिंबा? ‘टीम तुकाराम मुंढे’ लिहिलेला टी-शर्ट घालून दिसली अभिनेत्री, व्हिडीओ चर्चेत

यावेळी ‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेबाबतही मोहन भागवत यांनी सविस्तर भाष्य केलं. देशामध्ये विविधता असणं स्वाभाविक आहे, मात्र या विविधतेमध्ये असलेलं ऐक्य हेच सत्य आहे, असा हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेचा अर्थ असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतामध्ये विविध धर्म, विचारधारा आणि श्रद्धांचे लोक एकत्र राहतात आणि हीच भारताची ओळख असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

जर एखादा हिंदू असा विचार करत असेल की भारतात मुस्लिम व्यक्ती असायलाच नको, तर त्याला हिंदू कसं म्हणता येईल? असा सवालही मोहन भागवत यांनी उपस्थित केला. बाहेरून प्रत्येकाचं अस्तित्व वेगवेगळं दिसत असलं तरी प्रत्येकाचा धर्म हा माणुसकीचाच आहे, असं त्यांनी म्हटलं. माणसांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद करणं योग्य नाही. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असू शकतात, मात्र सर्वांचं अंतिम ध्येय एकच असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

‘हिंदू’ हा शब्द केवळ एखाद्या विशिष्ट धर्माशी किंवा पूजा पद्धतीशी जोडलेला नसल्याचंही मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं. हिंदू धर्माच्या अंतर्गतही अनेक वेगवेगळी मतं आणि विचार असू शकतात. भारतामध्ये विविध विचारधारांचे लोक राहतात. त्यामध्ये आस्तिक, श्रद्धाळू तसेच नास्तिकांचाही समावेश आहे. इतकी विविधता असूनही भारतात ऐक्य टिकून आहे आणि हेच भारताचं वैशिष्ट्य असल्याचं मोहन भागवत यांनी म्हटलं.

follow us