पीएसआय परीक्षेत मोठा घोटाळा? 615 पैकी तब्बल 150 जण मास कॉपी करून पास झाल्याचा रोहित पवारांचा दावा
विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कॉपी झाल्याची माहिती समोर आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
Major scam in PSI exam : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गंभीर आरोप केला आहे. विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कॉपी झाल्याची माहिती समोर आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. या परीक्षेतील 615 उमेदवारांपैकी जवळपास 150 जण ‘मास कॉपी’ करून उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर या कथित गैरप्रकारासंदर्भातील काही पुरावेही आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. विभागांतर्गत PSI पदाच्या परीक्षेत 615 पैकी जवळपास 150 जण मास कॉपी करून पास झाल्याची माहिती समोर आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणातील आरोपी अभिजीत लेंडवे आणि त्याच दर्जाचा आणखी एक अधिकारी या प्रकरणात सहभागी असल्याचे पुरावे आपल्याकडे आल्याचा दावाही पवार यांनी केला आहे. या पुराव्यांचा लवकरच खुलासा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची चौकशी करताना प्रामाणिकपणे मेहनत करून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. गैरप्रकार करणाऱ्यांची मात्र चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अभिजीत लेंडवे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांसह काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आयोगाची प्रतिष्ठा खराब केली असून आयोगाच्या विश्वासार्हतेला तडे गेले आहेत, असा आरोपही रोहित पवार यांनी केला. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कचाट्यातून आयोगाला मुक्त करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी पुण्यातील विद्यार्थी आक्रोश मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
एमपीएससी अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्यासाठी परीक्षार्थी रस्त्यावर; दिपकेंसह मविआचा आंदोलनाला पाठिंबा
दरम्यान, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांच्या या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटी आणि सातत्याने होणाऱ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडाला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्याचे सांगत त्यांनी मोर्चाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. स्थानिक शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एमपीएससी परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि विविध गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि शिक्षकांनी विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.
एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा आणि या पदावर स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, यासह विद्यार्थी आणि शिक्षकांच्या इतरही काही मागण्या आहेत. ‘विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या भूमिकेतून सोमवार, 7 सप्टेंबर रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर चौकापासून (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल) सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी आणि शिक्षकांचा विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.