मोठ्या आवाजाला विरोध केला अन् जीव गेला! दिल्लीत मणिपुरी संगीत शिक्षकाची बेदम मारहाण करून हत्या

हल्लेखोरांनी विक्रम सिंह यांना कॉरिडॉरमध्ये गाठले, घेरले आणि बेदम मारहाण केली, असा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 09T140453.011

Music teacher beaten to death : दिल्लीतील एका 54 वर्षीय संगीत शिक्षकाची बेदम मारहाण करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव चोंगथम विक्रम सिंह असून ते मूळचे मनुपुरचे होते. घराबाहेर सुरू असेलल्या मोठ्या आवाजाला आणि गोंधळाला त्यांनी विरोध केला आणि त्यानंतर झालेल्या वादातून आठ जणांच्या टोळक्याने त्यांचे पाठलाग करत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत जाऊन मारहाण केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून एका अलवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पण चोंगथम विक्रम सिंह कोण होते? त्या रात्री त्यांचा वाद कोणासोबत आणि कशामुळे झाला? हल्लेखोर घरापर्यंत कसे पोहोचले? आणि या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमधून नेमकं काय समोर आलं? पाहूया संपूर्ण घटनाक्रम…

चोंगथम विक्रम सिंह हे गेल्या 17 वर्षांपासून दिल्लीत खासगी संगीत शिक्षक म्हणून काम करत होते. मणिपूरमध्ये देखील त्यांची गिटारवादक आणि संगीत म्हणून ओळख होती. दिल्लीतील किलोकरी गावात एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये ते पत्नी जोश्ना चोंगथम आणि 20 वर्षीय मुलगा याईफाबा चोंगथम यांच्यासोबत राहत होते. रविवारी रात्री सुमारे साडेअकरा वाजता विक्रम सिंह कचरा टाकण्यासाठी घरातून खाली आले. याचवेळी त्यांचं घराजवळील दोन ढाब्यांशी संबंधित काही कर्मचारी बाहेर मोठमोठ्याने ओरडत आणि गोंधळ घालत असल्याचे आरोप आहे. विक्रम सिंह यांनी या आवाजावर आणि गोंधळावर आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांच्यात आणि संबंधित व्यक्तींमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.

हा वाद काही वेळातच चिघळला. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात आल्यानंतर विक्रम सिंह आपल्या फ्लॅटकडे परत निघाले. मात्र, आठ जणांच्या गटाने त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. विक्रम सिंह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर देखील हा पाठलाग थांबला नाही. हल्लेखोरांनी त्यांना कॉरिडॉरमध्ये गाठले, घेरले आणि बेदम मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीनंतर संबंधित व्यक्ती तिथून निघून गेल्या.

ट्रॅफिक नियम मोडल्यास पॉईंट कट; मर्यादा ओलांडताच लायसन्स रद्द, गडकरींची मोठी घोषणा

या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर शेअर केले. या फुटेजमध्ये आठ जण जिन्यावरून खाली उतरताना दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे. एन. बीरें सिंह यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दिल्ली पोलिसांनी तातडीने योग्य कारवाई करावी आणि विक्रम सिंह यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विक्रम सिंह यांना त्यांच्या मुलाने ओखला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. दिल्ली पोलिसांना सोमवारी पहाटे 1 वाजून 38 मिनिटांनी मारहाणीची माहिती मिळाली. विक्रम सिंह यांची प्रकृती गंभीर होती आणि अखेर सकाळी सुमारे सात वाजता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज. तांत्रिक तपास आणि स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या आठ जणांची ओळख पटवण्यात आली.

त्यापैकी सात आरोपींना अटक करण्यात आली, तर एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भारत कुमार, प्रमोद, रमजान खान, विजय, दीपांशु, मोहन विश्वकर्मा आणि मन्नू यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, यातील चार आरोपी जवळच्या ढाब्यांमध्ये डिलिव्हरीचे काम करत होते, तर दोघे पॅकेजिंगचे काम करत होते. मन्नू हा पिझ्झा किऑस्कमध्ये कार्यरत होता.

क्रूड 100 डॉलरजवळ पोहोचताच चिंता वाढली; सामान्य भारतीयांसह जगासाठी याचा अर्थ काय?

या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा होता आणि त्यामध्ये प्रत्येक आरोपीची भूमिका काय होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर राजकीय स्तरावर देखील प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी ही घटना फक्त मद्यधुंद अवस्थेत झालेल्या हिंसाचाराची स्वतंत्र घटना म्हणून पाहू नये, अशी भूमिका मांडली. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजातील संगीत, गोंधळ आणि नियमांकडे दुर्लक्ष याविरोधात सातत्याने कठोर कारवाई न झाल्याने अशा घटनांसाठी वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस खासदार गौरव गोगई यांनी देखील चोंगथम विक्रम सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विक्रम सिंह यांच्या मृत्यूनंतर दिल्लीतील ईशान्य भारतातील नागरिकांमध्ये देखील करण्यात आला. सोमवारी संध्याकाळी किलोकरी गावात जवळपास १०० नागरिक एकत्र आले. त्यांनी कँडल मार्च काढून विक्रम सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आणि या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

17 वर्षांपासून दिल्लीत संगीत शिकवणाऱ्या एका मणिपुरी संगीत शिक्षकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने या प्रकरणाकडे आता गंभीरपणे पाहिले जात आहे. पोलिसांच्या तपासानुसार, घराबाहेरील आवाज आणि गोंधळावर आक्षेप घेतल्यानंतर वाद झाला आणि त्यानंतर विक्रम सिंह यांचा पाठलाग करत त्यांना इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सात आरोपींना अटक झाली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, हल्ल्यामागे आणखी काही कारण होते का आणि या घटनेत प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत.

Tags

follow us