‘जगाचा तू अधिपती, तूच रे गणपती’ हे भक्तिमय गीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रदर्शित
पारंपरिक गणेशभक्तीला आधुनिक संगीताची जोड देत हे गीत साकारण्यात आले असून, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते गणेशभक्तांच्या भेटीला आले आहे.
jagacha tu adhipati tuch re ganpati : गणरायाच्या भक्तिभावाला सुरेल संगीताची जोड देणाऱ्या ‘जगाचा तू अधिपती, तूच रे गणपती’ या भक्तिमय गीताचे प्रकाशन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते नुकतेच उत्साहात संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश प्रवक्त्या ॲड. रूपाली पाटील ठोंबरे, महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
गणपती बाप्पाचा महिमा, त्याच्यावरील श्रद्धा आणि भक्तिभाव यांचा सुरेल आविष्कार या गीतातून करण्यात आला आहे. पारंपरिक गणेशभक्तीला आधुनिक संगीताची जोड देत हे गीत साकारण्यात आले असून, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते गणेशभक्तांच्या भेटीला आले आहे.
कुकडी’च्या डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती; वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
या भक्तिगीताची निर्मिती श्रीनिवास गोविंद कुलकर्णी, अमोल घोडके आणि मधुसूदन गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे. निलेश काटके यांनी गीताचे शब्द लिहिले असून, रंगराज पुराणिक यांनी संगीतबद्ध केले आहे. अभिमन्यू कार्लेकर यांनी संगीत निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. गायक सौरभ साळुंके यांनी आपल्या दमदार आणि भावपूर्ण आवाजातून गीताला स्वर दिला आहे.
या गीताचे ध्वनिमुद्रण डॉन स्टुडिओज येथे करण्यात आले असून, निर्मिती प्रक्रियेत कुणाल माथा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. शब्द, संगीत आणि गायनाचा सुरेल मेळ साधत गणरायाविषयीची श्रद्धा प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या गीतातून करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात आरत्या आणि भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय होत असताना ‘जगाचा तू अधिपती, तूच रे गणपती’ हे गीत गणेशभक्तांसाठी संगीताची विशेष पर्वणी ठरणार आहे. पारंपरिक भक्तिरस आणि आधुनिक संगीताचा संगम असलेल्या या गीताला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.