National Girl Child Day : भारतात सर्वाधिक मृत्यू मुलींचेच; अत्याचारांमध्येही लक्षणीय वाढ

  • Written By: Published:
National Girl Child Day : भारतात सर्वाधिक मृत्यू मुलींचेच; अत्याचारांमध्येही लक्षणीय वाढ

National Girl Child Day : आज (दि. 24) राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रीय बालिक दिवस साजरा केला जातो. मात्र, दुसरी बाजू बघितल्यास भारतात सर्वाधिक मृत्यू हे मुलींचेच होत असून, मुलींवरील अत्याचारांमध्येदेखील वाढ झाल्याचे धक्कादायक चित्र आहे.

UPSC निकाल जाहीर! इशिता किशोर देशात पहिली; तिन्ही टॉपर मुलीच

कधीपासून सुरू करण्यात आला राष्ट्रीय बालिका दिवस

संयुक्त राष्ट्र महासभेने 19 डिसेंबर 2011 रोजी एक ठराव स्वीकारत 11 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून घोषित केला. मुलींना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. मात्र, संयुक्त राष्ट्राने आंतराराष्ट्रीय बालिका दिवस जाहीर करण्यापूर्वी म्हणजेच 2008 मध्ये मुलींना भेडसावणाऱ्या समस्या अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) म्हणून घोषित केला होता.

चांद्रयान-3 मोहिमेच्या काउंटडाउनचा आवाज थांबला, इस्रोच्या शास्त्रज्ञ एन. वलरमथी यांचे निधन

अनेक योजना तरही मुलींचा मृत्युदर अधिक

भारतात मुलींसाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने बेटी बचाओ, बेटी पढाओ यांसह विविध योजनांचा समावेश आहे. मात्र, असे असतानाही मुलांच्या तुलनेत मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. तसेच मृत्युदरही अधिक आहे. युनिसेफच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर, मुलींच्या जन्मावेळी मुलांपेक्षा जगण्याचे प्रमाण जास्त असते. पण भारत हा एकमेव असा देश आहे जिथे मुलांपेक्षा मुलींचा मृत्युदर अधिक असल्याचे समोर आले आहे.

भारतात, रोजगार, भीक मागणे, लैंगिक शोषण आणि बालमजुरी अशा विविध कारणांसाठी असंख्य मुलांची तस्करी केली जाते. मुंबई आणि कोलकाता या शहरांमधून मुली आणि महिलांची तस्करी करण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, दरवर्षी साधारण 60 हजारांहून अधिक मुले बेपत्ता होतात, यात मुलींची टक्केवारी जास्त आहे.

Chandrayan 3 : चांद्रयान-3 च्या लॅंडिंगची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्या डॉ. रितू करिधाल आहेत तरी कोण?

प्रत्येक क्षेत्रात मुलींचा ठसा तरीही मुलांना अधिक मान

आज देशासह जगातील प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या खांद्याला खांदा देत मुली दैदिप्यमान कामगिरी करत आहेत. आज भारताच्या मुली केवळ लढाऊ विमानेच उडवत नाहीत तर सैन्यातही देशाचं रक्षण करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. नुकत्यात चंद्रावर यसस्वीपणे पार पडलेल्या चांद्रयान 3 मोहिमेतही मुलींचा मोठा वाटा आहे. मात्र, असे असतानाही अनेक घरांमध्ये मुलींच्या तुलनेत मुलांना अधिक मान दिला जात असल्याचेच चित्र आहे. लैंगिक भेदभाव आणि सामाजिक दृष्टिकोन, परंपरागत चालत आलेल्या रूढीप्रथा यांच्यामुळे मुलींना आजही बालविवाह, अत्याचार, हिंसाचार आदींसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

भ्रूणहत्या, बालविवाह आणि बालपणी गर्भधारणा

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-21 नुसार, भारतातील एकूण लिंग गुणोत्तर 1020 मुलींवर पोहोचले आहे. आजही शहरांमध्ये हजार मुलांमागे मुलींची संख्या केवळ 985 आहे. ग्रामीण भागात समाधानकारक लिंग गुणोत्तर असूनही, वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेमुळे नवजात बालकांपासून ते 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. यात मुलींचे प्रमाण अधिक आहे. याच सर्वेक्षणानुसार, देशातील 23 टक्के किशोरवयीन मुलांचे वय 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच लग्न केले जाते, ज्यामध्ये बहुसंख्य मुली आहेत. सर्वेक्षणात 15 ते 19 वयोगटातील 6.8 टक्के मुली बालविवाहामुळे गर्भवती किंवा माता झाल्याचे आढळून आले आहे.

मुलींवरील अत्याचारांमध्येही वाढ

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या 2021-22 च्या अहवालानुसार, 2022 मध्ये एकूण 83,350 मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. ज्यामध्ये 20,380 मुले आणि 62,946 मुली आहेत. 2012 च्या तुलनेत मुलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण 7.5 टक्क्यांनी वाढलेआहे. या बेपत्ता मुलींपैकी 60,281 मुली सापडण्यात यश आले. मात्र, 1,665 मुलींचं काय झालं याची कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

मुली बेपत्ता होण्यासोबतच त्यांच्यावरील अत्याचारांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतीय संस्कृतीत कन्येला लक्ष्मी मानले जाते. मात्र असे असतानाही त्यांच्यावरील अत्याचारांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2021-22 च्या NCRB अहवालानुसार, 2021 मध्ये देशात एकूण 62,095 प्रकरणे POCSO कायद्यांतर्गत नोंदवण्यात आली आहेत. 2022 मध्ये ही आकडेवारी 63,116 पर्यंत वाढली आहेत.
2021 मध्ये मुलींवरील बलात्काराची एकूण 37,511 प्रकरणांची नोंद करण्यात आली जी 2022 मध्ये वाढून 38,030 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे लैंगिक अत्याचाराच्या संख्येत 3.1 टक्के आणि लैंगिक छळाच्या संख्येत 10.4 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube