हे काय! सुनील तटकरे विरोधी बाकांवर; श्रीनिवास पाटलांच्या शेजारी बसून ऐकलं PM मोदींचं भाषण

हे काय! सुनील तटकरे विरोधी बाकांवर; श्रीनिवास पाटलांच्या शेजारी बसून ऐकलं PM मोदींचं भाषण

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे (अजित पवार) गटाचे खासदार सुनील तटकरे हे आज लोकसभेत विरोधी बाकांवर बसलेले दिसले. अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना संपूर्ण भाषण त्यांनी विरोधी बाकावर बसूनच ऐकले. राष्ट्रवादीचे (शरद पवार) गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शेजारी बसूनच तटकरे यांनी हे भाषण ऐकले. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या अगदी समोर बसल्या होत्या. (Nationalist Congress Party (Ajit Pawar) MP Sunil Tatkare was seen sitting on the opposition benches in the Lok Sabha)

राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीच्या लोकसभेतीस पाच खासदारांपैकी सुनील तटकरे यांनीच अजित पवार यांच्या गटात सहभाग घेतला. तर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील आणि पी. पी. फैजल यांनी पवारांसोबतच राहणं पसंत केलं. अशात लोकसभेमध्ये आज अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार होते. त्यानंतर अविश्वास प्रस्वावावर मतदानही होणार होते. यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हीप जारी करण्यात आले. यात तटकरे यांचा व्हीप मोदी सरकारच्या बाजूने होता. तर पी. पी. फैजल यांचा सरकार विरोधात व्हीप जारी करण्यात आला होता.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान, स्वतः सुनील तटकरे हेच विरोधकांच्या बाकावर बसलेले दिसून आले. त्यामुळे अजित पवार यांचे बंड आणि राष्ट्रवादीत मागील महिन्याभरात घडलेल्या घडामोडी यावर चर्चा सुरु झाली आहे.

कोल्हे म्हणाले, मला गांधीजींच्या 3 माकडांची आठवण :

दरम्यान, राष्ट्रवादीकडून बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, मी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ बोलत आहे. सरकारच्या कार्यपद्धतीकडे पाहून मला गांधीजींच्या तीन माकडांची आठवण देते. सरकारच्या विरोधात काहीही ऐकू नका, निवडणुका सोडून देशाची काय परिस्थिती आहे ते पाहू नका आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची बोलती बंद करा. मग या सरकारवर विश्वास ठेवायचा तरी कसा ? जे सरकार महागाईवर बोलत नाही, आर्थिक वाढीचे आकडे तर फेकतात, पण दरडोई उत्पन्नावर बोलत नाही. गृहमंत्र्यांनी काल अगदी योग्य विधान केलं की, आकडे कधीच खोटे बोलत नाहीत. यामुळं अर्थव्यवस्था जेव्हा पाचव्या क्रमांकावर पोहोचते, तेव्हा दरडोई उत्पन्नात देश १४१ व्या क्रमांकावर आहे. तर काय देशाची संपत्ती काही निवडक लोकांच्याच हातात जात आहे का? असा सवाल त्यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube