शेअर बाजारासारखं आता पावसावर होणार ट्रेडिंग; मुंबईतील पावसावर लागणार पैसा वाचा काय होणार?
Mumbai Rain पावसाचा अधिकृत डेटा IMD कडून घेतला जाईल. हे कॉन्ट्रॅक्ट जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांसाठीच उपलब्ध असतील
NCDEX launches India’s first weather derivative to trade Mumbai’s rainfall : भारतात मान्सूनची अनिश्चितता आणि पावसाचा लहरीपणा हा नेहमीच आर्थिक चिंतेचा विषय राहिला आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. मात्र, आता या आर्थिक नुकसानीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी देशात एक क्रांतीकारी पाऊल उचलण्यात आले आहे. भारताचे प्रमुख एग्रीकल्चरल कमोडिटी एक्सचेंज, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) ने देशातील पहिले एक्सचेंज-ट्रेडेड वेदर डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट लाँच केले आहे, ज्याचे नाव “RAINMUMBAI” असे ठेवण्यात आले आहे. हे कॉन्ट्रॅक्ट थेट मुंबईत होणाऱ्या पावसाच्या डेटावर आधारित असणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता शेअर बाजाराप्रमाणेच पावसाच्या लहरीपणावरही कायदेशीररित्या ट्रेडिंग आणि आर्थिक जोखीम व्यवस्थापन (Hedging) करता येणार आहे.
‘RAINMUMBAI’ मार्केट कसं काम करणार?
NCDEX ने दिलेल्या माहितीनुसार, हे कॉन्ट्रॅक्ट बाजारातील Stakeholders पावसाच्या चढ-उतारामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या कॉन्ट्रॅक्टसाठी पावसाचा अधिकृत डेटा IMD कडून घेतला जाईल. हे कॉन्ट्रॅक्ट मान्सूनच्या कालावधीत म्हणजेच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांसाठीच उपलब्ध असतील. हे कॉन्ट्रॅक्ट IIT बॉम्बेच्या मदतीने विकसित केलेल्या ‘क्युम्युलेटिव्ह डेव्हिएशन रेनफॉल’ (CDR) मॉडेलवर आधारित असून, ते मुंबईतील ‘लॉन्ग-पिरियड ॲव्हरेज’ आणि प्रत्यक्ष पडणारा पाऊस यांच्यातील फरकाचा मागोवा घेईल. हे सर्व व्यवहार ‘कॅश-सेटल’ म्हणजेच थेट पैशांच्या स्वरूपात पूर्ण केले जातील. ट्रेडरसाठी यामध्ये पुरेशी Liquidity राहावी, म्हणून एक्सचेंजने एका ‘मार्केट मेकर’चीही नियुक्ती केली आहे.
Mumbai, Maharashtra: When asked how significant is the launch of RAINMUMBAI, India’s first exchange-traded weather derivatives contract, for agricultural and commodities ecosystem, Head of Regional Meteorological Centre (RMC) Mumbai, Bikram Singh says, "So see this has been made… pic.twitter.com/3ovpSpq61H
— IANS (@ians_india) May 20, 2026
वेदर डेरिव्हेटिव्ह (Weather Derivative) म्हणजे काय?
वेदर डेरिव्हेटिव्ह हे असे आर्थिक करार असतात, जे व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांना हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे (उदा. अतिउष्णता, बर्फवृष्टी, अतिवृष्टी किंवा कमी पाऊस) होणाऱ्या आर्थिक जोखमीपासून सुरक्षित ठेवतात.
इन्शुरन्स आणि वेदर डेरिव्हेटिव्हमधील फरक काय?
सर्वसामान्य इन्शुरन्स हा प्रत्यक्ष वस्तू किंवा पिकाचे भौतिक नुकसान झाल्यानंतर क्लेमची पडताळणी करून पैसे देतो. मात्र, वेदर डेरिव्हेटिव्ह हे आधीच ठरवलेल्या हवामानाच्या आकड्यांवर चालतात. जर मुंबईतील पाऊस सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त झाला, तर प्रत्यक्ष नुकसान मोजण्याची वाट न पाहता डेटाच्या आधारे थेट पेमेंट केले जाते. त्यामुळे हा इन्शुरन्सला एक उत्तम पूरक पर्याय ठरणार आहे.
कोणत्या क्षेत्रांना होणार सर्वाधिक फायदा?
1. कृषी क्षेत्र : कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास बँका किंवा कृषी कर्ज देणाऱ्या संस्था या कराराद्वारे स्वतःचे आर्थिक नुकसान भरून काढू शकतात.
2. ऊर्जा कंपन्या : मान्सूनदरम्यान अनपेक्षित थंड हवेमुळे विजेची मागणी कमी झाल्यास होणारा तोटा भरून काढण्यासाठी वीज कंपन्या याचा वापर करू शकतात.
3. लॉजिस्टिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर : मुंबईत अतिवृष्टीमुळे वाहतूक आणि बांधकाम ठप्प झाल्यास कंपन्यांना होणारे नुकसान या ट्रेडिंगच्या माध्यमातून हेज (कमी) करता येईल.
शतकांचे संकट आता मॅनेज होणार
“भारत शतकानुशतके मान्सूनच्या अनिश्चिततेच्या छायेखाली जगत आला आहे. ‘RAINMUMBAI’ हे प्रत्येक स्टेकहोल्डरला या अनिश्चिततेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी एक नियमन केलेले आणि अत्यंत वैज्ञानिक साधन प्रदान करेल असे NCDEX चे एमडी आणि सीईओ अरुण रास्ते यांनी सांगितले. एकूणच काय तर, निसर्गाच्या लहरीपणावर माणसाचे नियंत्रण नसले, तरी त्यापासून होणाऱ्या कोट्यवधींच्या आर्थिक नुकसानीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय बाजाराला आता ‘RAINMUMBAI’ च्या रूपाने एक नवे आणि आधुनिक हत्यार मिळाले आहे.