NEET-UG 2024 : नीट पेपर लिक प्रकरणी संजीव मुखियाला क्लिनचीट…सीबीआयला कोणताही पुरावा मिळाला नाही
सीबीआयने नीट युजी पेपरफुटी प्रकरणात संजीव मुखिया यांना 'क्लीन चिट' दिलीयं. कोणताही पुरावा नसल्याचं सीबीआयने स्पष्ट केलंय.
NEET-UG 2024 : सीबीआयने NEET-UG २०२४ पेपरफुटी प्रकरणात संजीव मुखिया यांना ‘क्लीन चिट’ दिली आहे. या प्रकरणातील सहभागाबाबत संजीव कुमार, ऊर्फ संजीव मुखिया यांच्या विरोधात तपासदरम्यान कोणताही पुरावा आढळला नाही, असे तपास यंत्रणेने स्पष्ट केले. संजीव मुखिया यांना जाणीवपूर्वक वाचवण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.
बिहार पोलिसांनी सुरुवातीला NEET-UG 2024 ची प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी संजीव मुखियाचे नाव एफआयआरमध्ये (FIR) समाविष्ट करण्यात आले होते, कारण यापूर्वी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटणे आणि चोरीला जाणे यांसारख्या प्रकरणांमध्ये संजय मुखिया आरोपी राहिला होता. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.
पुन्हा दिसलास तर खिशात 50 ग्रॅम पावडर टाकेन; धमकी देणाऱ्या पोलिसाला गृह विभागाचा दणका..
सखोल तपासदरम्यान, या एजन्सीने प्रश्नपत्रिका चोरी आणि वितरणात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची तसेच त्याचा लाभ घेतलेल्यांची ओळख पटवली. या प्रकरणाच्या संदर्भात आतापर्यंत पाटणा येथील न्यायालयात ४५ आरोपींविरुद्ध अनेक आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत.
तपासादरम्यान ‘नीट-यूजी २०२४’ (NEET-UG 2024) ची प्रश्नपत्रिका चोरण्याच्या किंवा ती वितरित करण्याच्या कटात संजीव मुखिया यांचा सहभाग असल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सापडला नसल्याचं सीबीआयने स्पष्ट केलंय. तपासाच्या काळात संजीव मुखिया फरार होते. नंतर, बिहार पोलिसांनी त्यांना इतर प्रकरणांच्या संदर्भात अटक केली. ‘नीट-यूजी’ प्रकरणाशी संबंधित एफआयआरमध्येही (FIR) नाव असल्याने, चौकशीसाठी सीबीआयने त्यांना पोलीस कोठडीत घेतले होते.
तुकाराम मुंढेंच्या एफडीएची बीएमसी मुख्यालयात धडक, मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन केले सील
संजीव मुखिया यांना तपासापासून दूर ठेवण्यात आले होते, हा दावा चुकीचा आहे. सीबीआयला चौकशी आणि तपास करूनही त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा आढळला नाही. त्यामुळे सीबीआयने या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले नाही. एजन्सीने स्पष्ट केले की, नीट-यूजी (NEET-UG) प्रकरणात जामीन मंजूर होऊनही, बिहार पोलिसांकडून इतर प्रकरणांमध्ये सुरू असलेल्या तपासामुळे संजीव मुखिया न्यायालयीन कोठडीतच राहिले.
दरम्यान, NEET-UG 2024 पेपरफुटी प्रकरणामागील संपूर्ण कट उघडकीस आला असून, यात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. संजीव मुखिया यांना जाणीवपूर्वक तपासातून वगळण्यात आले होते, हा दावा पूर्णपणे असत्य आणि दिशाभूल करणारा असल्याचं सीबीआयने स्पष्ट केलंय.