NEET Exam : हेच प्रश्न उद्या परिक्षेत येतील ते नाशिक कनेक्शन; नीट परिक्षेचा पेपर नेमका कसा फुटला?
NEET UG Exam 3 मे रोजी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर घाम गाळत होते, तेव्हा काही 'बाजारू' प्रवृत्तींनी त्यांच्या भविष्याचा सौदा आधीच केला होता.
NEET UG 2026 Paper Leak Case : 3 मे 2026… देशातील 24 लाख विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचले. पण त्यांना माहीत नव्हतं की, ज्या पेपरसाठी त्यांनी रात्रंदिवस एक केला, तो पेपर आधीच काही ‘बाजारू’ लोकांच्या मोबाईलवर फिरत होता. 180 पैकी चक्क 150 प्रश्न लीक झालेल्या हस्तलिखित संचातून जसेच्या तसे आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, सरकारने NEET UG 2026 परीक्षा रद्द केली असून याचा तपास आता CBI कडे सोपवण्यात आला आहे. पण, ‘नीट’चा पेपर नेमका फुटला कसा? याबद्दलची धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे.
NEET रद्द झाली, पण दोषींना शिक्षा काय?; संसदेने मंजूर केलेल्या कायद्याची A टू Z माहिती
नाशिकमध्ये पहिली कॉपी अन् हरियाणात 10 सेट
तपास यंत्रणांच्या हाती लागलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. या पेपरफुटीचा उगम आणि प्रसार नाशिकमधून सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात 30 वर्षीय शुभम खैरनार या संशयित आरोपीला इंदिरानगर भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलं आहे. खैरनार मूळचा नाशिकचा असून तो भोपाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिकमधील लीक प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचली, येथे फुटलेल्या पेपरचे 10 सेट तयार करण्यात आले. त्यानंतर, हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीरपर्यंत नीटची प्रश्नपत्रिका सहजपणे पोहोचली. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार जयपूरमधून अटक करण्यात आलेला मनीष हाच पेपरफुटीचा मास्टरमाईंड असल्याचे दिसून येत असून, मनिषने प्रश्नपत्रिका प्रिंट होण्यापूर्वीच पेपरमधी संभावित प्रश्न माहिती करुन घेतले होते. मनिषने प्रश्नपत्रिका प्रिंट होण्यापूर्वीच पेपरमधी संभावित प्रश्न माहिती करुन घेतले होते असे सांगितले जात आहे.
42 तास आधीच पेपर लीक
3 मे रोजी जेव्हा प्रामाणिक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर घाम गाळत होते, तेव्हा काही ‘बाजारू’ प्रवृत्तींनी तुमच्या भविष्याचा सौदा आधीच केला होता. 1 मे रोजी सकाळीच प्रश्नपत्रिका टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवर फिरत होती. गुन्हेगारांनी याला ‘गेस पेपर’ असे नाव देऊन त्याची विक्री सुरू केली होती. धक्कादायक म्हणजे केरळमधील एका नामांकित मेडिकल कॉलेजच्या MBBS विद्यार्थ्याने 1 मे रोजी हा पेपर लीक केला आणि तो राजस्थानच्या ‘सीकर’ मधील कोचिंग हबपर्यंत पोहोचवला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
कपडे बदलले अन् संपूर्ण केस काढलेले होते
खैरनारबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ‘देशभरातून एकूण 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यातील नाशिकमधून शुभम खैरनार या संशयिताला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं, त्यानुसार आम्ही त्याला ताब्यात घेतलं आहे. ‘आम्हाला नाव मिळालं होतं पण पत्ता आणि अधिक माहिती नव्हती. काही प्रमाणात तांत्रिक माहिती मिळवली आणि आम्ही शोध सुरु केला. त्याने त्याचे कपडे बदलले होते, संपूर्ण केस काढून टाकले होते. शुभम देवाच्या दर्शनासाठी जात असताना रस्त्यात सापळा रचून त्याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितलं. राजस्थान पोलिसांच्या म्हणण्यानुसार नाशिकमधून नीटचा पेपर व्हाया हरियाणातून राजस्थानमध्ये पोहोचला होता’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
उद्या परीक्षेत हेच प्रश्न येतील पोरानं वडिलांना केला होता मेसेज
तर, तपासात केरळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने 2 मे रोजीच सीकरमध्ये राहणाऱ्या आपल्या वडिलांना जे एक पीजी हॉस्टेल संचालक आहेत त्यांना मोबाईलवर ‘गेस पेपर’ पाठवला असल्याचे सांगितले जात आहे. सोबत एक मेसेजही केला होता, ज्यात त्याने स्पष्टपणे सांगितले होते की, “हा पेपर तुमच्या हॉस्टेलमधील मुलींना द्या, उद्या परीक्षेत हेच प्रश्न येतील!” 3 मे रोजी सकाळीच हा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. या पीजी चालकाने एका नामांकित कोचिंग क्लासच्या शिक्षकाला हा पेपर दाखवून पडताळणी केली, तेव्हा सत्य समोर आले.
नीट परीक्षेतील बायोलॉजीचे सर्व 90 प्रश्न हे 2000 प्रश्नांच्या गेस पेपरमध्ये होते, तर केमिस्ट्रीचे सर्व 45 प्रश्न 81 प्रश्नांच्या गेस पेपरमध्ये जसेच्या तसे आढळले. विशेष म्हणजे, या प्रश्नांमधील स्वल्पविराम किंवा पूर्णविरामही बदललेला नव्हता, ज्यावरून ही केवळ अफवा नसून प्रिंटिंग प्रेस किंवा यंत्रणेतून झालेली थेट पेपरफुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोनं खरेदी टाळा, पण गुंतवणूक करा! पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला NSE चा नवा ‘डिजिटल’ पर्याय
परीक्षा रद्द पण, पुढे काय? NTA कडून विद्यार्थांना महत्त्वाचे आवाहन
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) पुनर्परीक्षेबाबत काही महत्त्वाचे निकष जाहीर केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आधी नोंदणी केली होती, त्यांना नवीन नोंदणी करण्याची गरज नसून, पुनर्परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्राची निवड आधीप्रमाणेच कायम ठेवली जाणार असून, विद्यार्थ्यांनी केवळ neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवरील माहितीवरच विश्वास ठेवावा आणि काही शंका असल्यास विद्यार्थी आणि पालकांनी neet-ug@nta.ac.in किंवा 011-40759000 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
ही वेळ कष्टाची, पराभवाची नाही
विद्यार्थ्यांनो, ज्या हातांनी भविष्यात रुग्णसेवा करायची आहे, त्या हातांना आज अन्यायाविरुद्ध लढा द्यावा लागतोय ही दुर्दैवी बाब आहे. परीक्षा रद्द होणे हा तुमच्या मेहनतीचा अपमान असला तरी, ‘शुद्ध गुणवत्तेचा’ विजय होण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा होता. सीबीआय चौकशीतून दोषींना कठोर शिक्षा होईलच, पण तुम्ही तुमची जिद्द ढळू देऊ नका. रिव्हिजनवर लक्ष केंद्रित करा आणि पुन्हा एकदा जिद्दीने मैदानात उतरा असे आवाहन लेट्सअप मराठी सर्व विद्यार्थांना करत आहे.