आता Unknown numbers बाय-बाय; 1 नोव्हेंबरपासून कॉलरचे नाव दाखवणे सरकारने केले अनिवार्य
unknown numbers caller name केंद्र सरकारने टेलीकॉम कंपन्यांना ग्राहकांना येणाऱ्या सर्व नंबर्स नाव दाखवणे अनिवार्य केले आहे.
No unknown numbers calling govt makes displaying caller name mandatory from November 1 : आता तुम्हाला कोणत्याही अनोळखी नंबर्सवरून कॉल येणार नाहीत. कारण आता केंद्र सरकारने टेलीकॉम कंपन्यांना ग्राहकांना येणाऱ्या सर्व नंबर्स नाव दाखवणे अनिवार्य केले आहे. हा नियम 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आलेल्या अनोळखी नंबर्सवरील कॉलचे नाव दिसणार आहे.
दूरसंचार विभागाच्या (DoT) आदेशानुसार, 4G आणि त्यापुढील पिढीच्या मोबाइल नेटवर्कवर, म्हणजेच 5G नेटवर्कवर, CNAP (Calling Name Presentation) सेवा प्रत्येक वापरकर्त्यासाठी डीफॉल्ट स्वरूपात सुरू केली जाणार आहे. या सुविधेमुळे फोन आल्यावर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि मोबाइल क्रमांक स्क्रीनवर दिसेल. 2G आणि 3G नेटवर्क तसेच सार्वजनिक स्विच्ड टेलिफोन नेटवर्कवर (PSTN) ही सेवा सुरू करण्याबाबत स्वतंत्रपणे विचार केला जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कॉलर आयडी कसे काम करणार?
दूरसंचार विभागाच्या आदेशानुसार, फोन आल्यावर मोबाइल स्क्रीनवर सर्वप्रथम कॉल करणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक दिसेल. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी संबंधित व्यक्तीचे नाव दाखवले जाईल. हे नाव फोन घेणाऱ्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील असेल. मात्र, कॉल करणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक फोनमध्ये सेव्ह केलेला नसेल, तर देशांतर्गत कॉलच्या बाबतीत संबंधित दूरसंचार कंपनीच्या ग्राहक डेटाबेसमध्ये नोंदवलेले नाव स्क्रीनवर दिसेल. आंतरराष्ट्रीय कॉल आल्यास स्क्रीनवर ‘International Call’ असे शब्द दिसतील. प्रत्येक दूरसंचार सेवा पुरवठादाराला ग्राहकांची नावे आणि त्यांचे मोबाइल क्रमांक यांची सांगड घालणारा डेटाबेस तयार करावा लागणार आहे. त्याची स्थापना, संचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारीही संबंधित कंपनीची असेल. कॉल प्राप्त करणाऱ्या व्यक्तीच्या दूरसंचार कंपनीला या डेटाबेसमधून कॉल करणाऱ्याचे नाव मिळवून ते ग्राहकाच्या स्क्रीनवर दाखवावे लागेल.
ग्राहकांच्या गोपनीयतेसाठी विशेष तरतुदी
या सुविधेची अंमलबजावणी करताना सुरक्षेला प्राधान्य देणारी (Security by Design) पद्धत अवलंबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार, येणारा कॉल संपल्यानंतर प्रश्न-उत्तर प्रक्रियेद्वारे मिळवलेले कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव साठवून ठेवता येणार नाही. तसेच, कॉलर आयडेंटिफिकेशन रेस्ट्रिक्शन (CLIR) सुविधा घेतलेल्या ग्राहकांची नावे स्क्रीनवर दाखवली जाणार नाहीत. या सुविधेमुळे कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि क्रमांक समोरच्या व्यक्तीपासून लपवता येतो.
व्यावसायिक ग्राहकांना पसंतीचे नाव दाखवण्याचा पर्याय
व्यावसायिक आणि मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या मोबाइल कनेक्शनसाठी दूरसंचार कंपन्या ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत नावाऐवजी पसंतीचे नाव दाखवण्याचा पर्याय देऊ शकतात. मात्र, या नावासाठी काही अटी असतील. संबंधित नाव एकतर ग्राहकाच्या नावावर ट्रेड मार्क्स रजिस्ट्रीमध्ये नोंदणीकृत ट्रेडमार्क असले पाहिजे किंवा वस्तू व सेवा कर (GST) पोर्टलवर नोंदणीकृत व्यावसायिक नाव असले पाहिजे. दूरसंचार कंपन्यांना या नावाची आणि त्यासंबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. सध्या सेवा वापरत असलेल्या ग्राहकांना आपले पसंतीचे नाव अपडेट करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
CNAP सेवा सुरू करण्यामागे काय कारण?
गेल्या काही महिन्यांत 4G आणि 5G नेटवर्कवर या सेवेच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. दूरसंचार विभागाच्या या आदेशात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) फेब्रुवारी २०२४ मधील शिफारशींचाही संदर्भ देण्यात आला आहे.ऑक्टोबर २०२५ मध्ये TRAI ने CNAP सेवा डीफॉल्ट स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या दूरसंचार विभागाच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली होती. मात्र, TRAI च्या मूळ शिफारशीत ही सुविधा केवळ ग्राहकाने मागणी केल्यानंतरच सुरू करण्याचा प्रस्ताव होता. आता नव्या आदेशानुसार, 4G आणि 5G नेटवर्कवरील वापरकर्त्यांसाठी ही सेवा डीफॉल्ट स्वरूपात सुरू करण्याची तरतूद करण्यात आली आहे.