सोनं खरेदी टाळा, पण गुंतवणूक करा! पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला NSE चा नवा ‘डिजिटल’ पर्याय
NSE Electronic Gold Receipt भारतीय संस्कृतीत सोने हे केवळ दागिना नसून संकटकाळातील एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
What Is NSE Electronic Gold Receipt EGR : ‘पुढील वर्षभर प्रत्यक्ष सोने खरेदी करू नका.’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. पण, भारतीय संस्कृतीत सोने हे केवळ दागिना नसून संकटकाळातील एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे मोदींच्या या आवाहनानंतर अनेकांसमोर आता सोनं खरेदी करायचे कसे असा प्रश्न उभा ठाकला आहे. पण, काळजी करू नका कारण सोन्यातील गुंतवणुकीसाठी NSE ने भन्नाट डिजिटल फॉर्म्युला आणला आहे. ज्यामध्ये तुम्ही अगदी 100 ग्रॅम सोनेही खरेदी करू शकणार आहात. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने आता ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स’ (EGR) हे नवीन दालन उघडले आहे. यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाचे पालन करत असतानाच गुंतवणूकदारांना डिजिटल स्वरूपात सोने जमा करण्याची संधी मिळणार आहे. नेमकं ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स’ काय त्याबद्दल जाणून घेऊया…
NEET रद्द झाली, पण दोषींना शिक्षा काय?; संसदेने मंजूर केलेल्या कायद्याची A टू Z माहिती
काय आहे ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड’ (EGR)?
सोप्या भाषेत सांगायचे तर, ईजीआर (EGR) म्हणजे तुम्ही खरेदी केलेल्या प्रत्यक्ष सोन्याचा डिजिटल पुरावा. ज्याप्रमाणे आपण शेअर्स खरेदी करून आपल्या डिमॅट खात्यात ठेवतो, त्याचप्रमाणे आता सोनेही डिजिटल स्वरूपात जतन करता येईल. तुम्ही जेवढे सोने खरेदी कराल, तेवढेच प्रत्यक्ष सोने ‘सेबी’च्या देखरेखीखाली अत्यंत सुरक्षित तिजोरीत तुमच्या नावाने जमा केले जाईल. यामुळे प्रत्यक्ष सोने जवळ बाळगण्याची जोखीम आणि सुरक्षिततेची चिंता पूर्णपणे मिटण्यास मदत होणार आहे.
आता फक्त 100 मिलीग्रॅममध्ये व्हा सोन्याचे मालक
अनेकदा सोने खरेदीसाठी मोठी रक्कम लागते असा समज असतो, मात्र NSE च्या या सुविधेमुळे आता अगदी 100 मिलीग्रॅमपासून गुंतवणूक सुरू करता येणार आहे. याव्यतिरिक्त 1 ग्रॅम, 10 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 1 किलो अशा विविध युनिट्समध्ये सोने खरेदीची यात सोय आहे. यामुळे सर्वसामान्य आणि कमी उत्पन्न गटातील व्यक्तींनाही सोन्याची बचत करणे सहज शक्य होणार आहे.
शुद्धतेची 100% हमी आणि पारदर्शकता
या प्रणालीमध्ये केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त 999 (24 कॅरेट) आणि 995 शुद्धतेच्या सोन्यातच व्यवहार होतात. त्यामुळे भेसळीचा धोका नाही. संपूर्ण देशभरात सोन्याचा एकच आणि बाजार-आधारित पारदर्शक दर सुनिश्चित करणे हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे. याशिवाय प्रत्यक्ष सोने खरेदी करताना लागणारे ‘मेकिंग चार्जेस’ आणि विकताना होणारी ‘मनमानी कपात’ यातून गुंतवणूकदारांची सुटका होण्यास यामुळे मदत होणार आहे.
एक वर्ष सोनं खरेदी थांबवलं तर काय होईल?; मोदींच्या आवाहनामुळे अर्थव्यवस्थेत मोठे बदल होण्याची चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला ‘डिजिटल’ साथ
पंतप्रधानांनी प्रत्यक्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यामुळे, ‘डिजिटल गोल्ड’ हा एक सुवर्णमध्य ठरत आहे. यामुळे सोन्याची आयात कमी होऊन भारताचे परकीय चलन वाचण्यास मदत होईल. “ईजीआरमुळे भारतात सोन्याशी व्यवहार करण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडला असून, भविष्यात भारत जागतिक स्तरावर सोन्याचे भाव निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असे मत NSE चे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीराम कृष्णन यांनी व्यक्त केले आहे.
थोडक्यात सांगायचे तर, सुरक्षितता, शुद्धता आणि सुलभता यांचा संगम असलेल्या या ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड’मुळे आता सर्वसामान्यांच्या गुंतवणुकीला खऱ्या अर्थाने ‘सोनियाचे दिवस’ येणार आहेत. त्याशिवाय सुरक्षितता, 100 % शुद्धता आणि सुलभता यामुळे ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड’ हा आता स्मार्ट गुंतवणुकीचा नवा मंत्र ठरणार आहे.