राज्याभिषेक झाला, अहंकारी राजा जनतेचा आवाज दाबतोय; राहुल गांधींचा हल्लाबोल

राज्याभिषेक झाला, अहंकारी राजा जनतेचा आवाज दाबतोय; राहुल गांधींचा हल्लाबोल

New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचवेळी दिल्ली पोलिसांकडून जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडून टाकण्यात येत होते. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, “राज्याभिषेक पूर्ण झाला – ‘अहंकारी राजा’ रस्त्यावरील जनतेचा आवाज दाबतोय.” नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक आणि भाजप सरकारमध्ये वाद सुरू आहेत. वास्तविक, नवीन संसदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते न करता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी विरोधकांची इच्छा होती.

आज, 28 मे रोजी, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी कुस्तीपटूंची येथे ‘महिला सन्मान महापंचायत’ होणार होती. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी शांततेत मोर्चा काढणार असल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांकडून जंतरमंतरवरच पैलवानांना थांबवण्यात आले. कुस्तीपटूंना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला होता. ठिकठिकाणी बॅरिकेडिंगही लावण्यात आले होते. यावेळी मोर्चा काढण्यासाठी कुस्तीपटूंनी पोलिसांचे बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला.

जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडले, पोलिसांनी तंबू उखडून टाकले

यावेळी नवीन संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी फरफटत नेले. यामध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह सर्व कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंच्या जंतरमंतरवरील सर्व तंबू देखील हटवले आहेत.

आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी जंतरमंतरवर भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंची एक छोटी क्लिप देखील शेअर केली आहे. राहुल गांधी महिला कुस्तीपटूंच्या अटकेचा निषेध करत म्हणतात की ”बेटी बचाओ और बेटी पढ़ाओ नया नारा है… लेकिन बेटी किससे बचाओ, बीजेपी से बचाओ.”

23 एप्रिलपासून देशातील अनेक कुस्तीपटू ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी जंतरमंतरवर आंदोलन करत होते. एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसह सात महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेसाठी कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube