अध्यादेश टराटरा फाडला, मनमोहन सिंगाचा अपमान केला; राहुल गांधींना अहंकार नडला
Rahul Gandhi News : सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर काँग्रेससह (Congress) देशभरातील विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत. मात्र, आज खासदारकी रद्द होण्यामागे आता राहुल गांधी यांनी साधारण 10 वर्षापूर्वी भर पत्रकार परिषदेतील त्यांची कृतीच त्यांच्या अंगलट आल्याची चर्चा सुरू झाली आहे. नेमकं 10 वर्षांपूर्वी राहुल गांधींनी असं काय केलं होते ज्यामुळे आज खासदारी गेल्यानंतर त्यांना पश्चाताप होत असेल.
साधारण 10 वर्षांपूर्वी राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काढलेला अध्यादेश टराटरा फाडून त्यांचा अपमान केला होता. राहुल गांधींच्या त्या कृत्यानंतर मनमोहन सिंग यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली होती. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी काढलेला अध्यादेश फाडला नसता तर, आज त्यांची खासदारकी वाचली असती. मात्र, त्यावेळी केलेली कृती आज काळाने त्यांच्यावर उलटी फिरवली आहे.
लालू प्रसाद यादव, जयललिता यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांना गमवावी लागली होती खासदारकी व आमदारकी
नेमका काय होता अध्यादेश
सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये एक निर्णय दिला होता. त्यानुसार खासदार किंवा आमदारांना दोन वर्षापेक्षा अधिकची शिक्षा ठोठावल्यास त्याचे सदस्यत्व तात्काळ रद्द होते आणि त्याला पुढील निवडणुकाही लढवता येत नाही. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मनमोहन सिंग यांनी राजकारण्यांचे संरक्षण व्हावे यासाठी हालचाल सुरू केली होती. एवढेच नव्हे तर, मनमोहन सिंग यांनी अध्यादेशही काढला होता. परंतु, काढण्यात आलेल्या अध्यादेशाला राहुल गांधींनी विरोध केला.
अन् पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी अध्यदेश फाडला
खासदार आमदारांच्या संरक्षणार्थ मनमोहन सिंग यांनी जो अध्यादेश आणला होता. त्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाणार होती. त्याचवेळी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी राहुल गांधी दाखल झाले, एवढेच नव्हे तर काढण्यात आलेला हा अध्यादेश अतिशय फालतु असल्याचे म्हणत तो भर पत्रकार परिषदेत टाराटरा फाडून टाकला. त्यांच्या या कृतीमुळे संबंधित अध्यादेश संसदेतून मागे घेण्यात आला.
परंतु, जर त्यावेळी राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडला नसता तर, आज त्यांची खासदारकी वाचली असती. पण आज भर पत्रकार परिषदेतील कृत्य तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अपमानाचा सूड काळाने घेतला आहे.